Headlines

शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकतेसाठी जिल्हा काँग्रेसची अमरावतीत निदर्शने:दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन




नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमरावती जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीने आज, शनिवार, २५ जुलै रोजी निदर्शने केली. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकतेची मागणी करत हे आंदोलन करण्यात आले. इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन झाले. केंद्र शासनाविरुद्ध प्रदर्शन करतानाच शिक्षण व्यवस्थेतील अनियमितता दूर करून परीक्षा व प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी यावेळी करण्यात आली. ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, खासदार बळवंत वानखडे आणि माजी आमदार प्रा. विरेंद्र जगताप यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. देशातील परीक्षा प्रक्रियेमधील अनियमितता, पेपरफुटी, प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ आणि शिक्षण व्यवस्थेतील वाढता भ्रष्टाचार यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व मानसिक नुकसान होत असल्याचे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले. शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाल्याने या क्षेत्रात तातडीने व्यापक सुधारणा करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या सर्व न्याय्य मागण्या तातडीने मान्य कराव्यात, परीक्षा व प्रवेश प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि निष्पक्षता सुनिश्चित करावी, पेपरफुटीतील दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच राष्ट्रीय परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित व विश्वासार्ह करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनाच्या शेवटी शिक्षण व्यवस्थेतील अनियमितता दूर करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे पाठविण्यात आले. या निवेदनात परीक्षांमधील अनियमितता आणि व्यवस्थात्मक अपयशावर संसदेत तातडीने चर्चा करावी, तसेच नवी दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थी व शांततापूर्ण निदर्शकांवर दाखल करण्यात आलेले सर्व एफआयआर मागे घ्यावेत, अशा मागण्याही नमूद होत्या. हे निवेदन भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच संबंधित केंद्रीय व राज्यस्तरीय अधिकाऱ्यांपर्यंत तातडीने पाठविण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. या आंदोलनात हरिभाऊ मोहोड, प्रकाश काळबांडे, रामेश्वर अभ्यंकर, प्रवीण मनोहर, श्रीकांतराव गावंडे, मुकद्दर खाँ पठाण, अरविंदराव लंगोटे, भैय्यासाहेब मेटकर, समीर पाटील, समाधान दहातोंडे, सुनील गावंडे, नितीन देशमुख, बाबूभाई इनामदार, पंकज वानखडे, संजय बेलोकर, प्रमोदराव दाळू, अमोल होले, अमोल धवसे, श्रीनिवास सूर्यवंशी, नामदेवराव तनपुरे, श्रीकांतराव झोडपे, चंदू डहाणे, महेंद्रसिंह गैलवार, राहुल येवले, उत्कर्ष देशमुख, अनिकेत डेंगळे, नितेश वानखडे, परिक्षीत जगताप, सागर देशमुख, समीर जवंजाळ आदींचा सहभाग होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *