Headlines

जंतर-मंतर आंदोलनातील कथित पोलिस अत्याचाराची NHRC कडे तक्रार:मानवाधिकार उल्लंघनाच्या आरोपांची स्वतंत्र चौकशीची मागणी




दिल्लीतील जंतर-मंतर येथे २० जुलै २०२६ रोजी नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान कथित पोलिस अत्याचार आणि मानवाधिकार उल्लंघनाच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पुण्यातील मानवी हक्क कार्यकर्ते आणि वकील ॲड. विकास शिंदे यांनी यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC), नवी दिल्ली यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कथित लाठीमार केल्याने अनेक विद्यार्थी जखमी झाले. तसेच, काही खासगी व्यक्तींनी पोलिसांसोबत आंदोलनकर्त्यांवर हल्ला केल्याचे व्हिडिओ, छायाचित्रे आणि प्रसारमाध्यमांतील वृत्तांतून समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. महिला व विद्यार्थिनींशी पोलिस कारवाईदरम्यान कथित गैरवर्तन, मारहाण आणि विनयभंग झाल्याच्या आरोपांचीही स्वतंत्र, निष्पक्ष आणि कालबद्ध चौकशी करण्याची मागणी तक्रारीत आहे. ॲड. शिंदे यांनी तक्रारीत भारतीय संविधानातील कलम १४, १९ आणि २१ चा उल्लेख केला आहे. नागरिकांना समानतेचा हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार तसेच जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण मिळते, असे त्यांनी नमूद केले. या अधिकारांच्या कथित उल्लंघनाची निष्पक्ष चौकशी आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या तक्रारीत घटनेची स्वतंत्र चौकशी, सीसीटीव्ही, बॉडी कॅमेरा, ड्रोन फुटेज व अन्य इलेक्ट्रॉनिक पुरावे तातडीने जतन करण्याचे निर्देश, जखमी आंदोलनकर्त्यांच्या वैद्यकीय नोंदी सुरक्षित ठेवणे, दोषी पोलिस अधिकारी अथवा संबंधित व्यक्तींवर फौजदारी व विभागीय कारवाई, पीडितांना योग्य नुकसानभरपाई आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मानवाधिकार व घटनात्मक तत्त्वांनुसार मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. “लोकशाही व्यवस्थेत शांततापूर्ण आंदोलन हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. आंदोलनकर्त्यांवर अनावश्यक बलप्रयोग झाल्याच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कायद्यानुसार कारवाई होणे आवश्यक आहे,” असे ॲड. विकास शिंदे यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *