![]()
पिंपरी चिंचवड मध्ये मध्यरात्री रस्त्यावर बसलेल्या सुमारे २० हजार रुपये किमतीच्या गायीची तीन अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना पिंपरी गावातील वैभवनगर परिसरात मंगळवारी (दि. २८ जुलै) पहाटे घडली. गाय चोरीची ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित ज्ञानेश्वर शिंदे (वय ३७, रा. मंडल दामोदर निवास, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर, पिंपरीगाव) यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी मध्यरात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास वैभवनगर येथील जगदंबा स्वीट होमशेजारी ही घटना घडली. रस्त्याच्या कडेला बसलेली काळ्या-पांढऱ्या रंगाची गाय तीन चोरट्यांनी संगनमत करून चोरून नेली. तिची किंमत सुमारे २० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. चोरी करणाऱ्या संशयितांचे वय अंदाजे २५ ते ३५ वर्षांच्या दरम्यान आहे. त्यापैकी एकाने काळ्या रंगाची हाफ पँट, काळे बनियन व टोपी, दुसऱ्याने काळ्या रंगाची थ्री-फोर्थ पँट आणि राखाडी रंगाचे टी-शर्ट, तर तिसऱ्याने काळी पँट व राखाडी रंगाचा शर्ट घातला होता. पिंपरी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम ३०५(अ), ३(५) तसेच प्राण्यांना क्रूरपणे वागवण्यास प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे आरोपींची ओळख पटवून चोरट्यांचा शोध सुरू असून, पिंपरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक चिरंजीव दलालवाड अधिक तपास करीत आहेत.
Source link
पिंपरी चिंचवडमध्ये मध्यरात्री गाय चोरी:रस्त्यावर बसलेली गाय चोरट्यांनी कारमध्ये घालून पळवली; घटना सीसीटीव्हीत कैद