![]()
भविष्यात नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर ही शहरे देशातील औद्योगिक विकासाचे मोठे केंद्र बनतील. त्यामुळे या ठिकाणी गुंतवणूक न केल्यास उद्योजकांना निश्चितच पश्चात्ताप होईल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अवादा समूहाने नागपुरात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यात सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची माहिती देत गुंतवणूकदारांना साद घातली. समृद्धी महामार्गालगत सुमारे २ हजार एकर जागेवर ‘न्यू नागपूर’ वसवले जात आहे. हे शहर मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलाच्या (बीकेसी) धर्तीवर ‘सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट’ म्हणून विकसित केले जाईल. या प्रकल्पासाठी ५० टक्के भूसंपादन पूर्ण झाले असून उर्वरित काम येत्या तीन महिन्यांत मार्गी लागेल. त्यानंतर प्रत्यक्ष पायाभूत सुविधांच्या निर्मितीला सुरुवात होईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बुटीबोरी येथील अवादा समूहाच्या सोलर प्रकल्पाची पाहणी केली. अवादा समूहाचे अध्यक्ष विनीत मित्तल यांनी त्यांची विशेष मुलाखत घेतली. या प्रकल्पाच्या विस्तारासाठी राज्य सरकार अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत २५० एकर जागा देणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली. अवादाच्या या प्रकल्पात सध्या सुमारे ५ हजार कामगार काम करत असून, नागपूरला देशातील सोलर उद्योगाचे हब बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. अतिरिक्त बुटीबोरीतील जागा संपत आल्याने आता तिसरी वसाहत उभारण्याचे आणि वर्धा जिल्ह्यातही भूसंपादन करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईचा वाहतूक वेग वाढवण्यासाठी सुरू असलेले प्रकल्प आणि २०२९ पर्यंत झोपडपट्टीमुक्त मुंबईचे उद्दिष्टही त्यांनी यावेळी बोलून दाखवले. ‘न्यू नागपूर’मध्ये उभे राहणार ‘गिफ्ट सिटी’चे मॉडेल न्यू नागपूर प्रकल्प औद्योगिक वसाहत नसून ती एक अद्ययावत इकोसिस्टीम असेल. गुजरातमधील ‘गिफ्ट सिटी’प्रमाणेच येथे सर्व प्रकारच्या उपयुक्तता सेवा (पाणी, वीज, इंटरनेट केबल्स) भूमिगत बोगद्यांमधून नेल्या जातील. २०२९ पर्यंत उद्योगांना अत्यंत स्वस्त दरात वीज देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. सोलर बॅटरी स्टोरेजच्या माध्यमातून उद्योगांना २४ तास वीज पुरवली जाईल.
Source link
संभाजीनगर हे राज्याचे नवे ‘ग्रोथ इंजिन’,गुंतवणूक न केल्यास पश्चात्ताप- सीएम:अवादा सौर प्रकल्पासाठी नागपूरच्या बुटीबोरीत 250 एकर जागेची घोषणा