![]()
महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या फुलेवाड्याच्या विस्तारीकरणाचे काम समाधानकारक नसल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, या कामासाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर असूनही प्रगती अपेक्षेप्रमाणे नाही. सरकार आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास तयार आहे. फुलेवाड्याच्या विस्तारीकरणामागे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या ऐतिहासिक कार्याची माहिती नव्या पिढीला प्रभावीपणे पोहोचवण्याचा उद्देश आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, ऑडिओ-व्हिडिओ प्रयोगांसह विविध माध्यमांतून विद्यार्थ्यांना फुलेवाड्याचा इतिहास समजावून सांगितला जाईल. या प्रकल्पासाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत अनेक बैठका घेतल्या आहेत. प्रशासनाने संबंधित सर्व कामे करण्याची तयारी दर्शवली असून, कामाला गती मिळणे आवश्यक असल्याचे भुजबळ यांनी अधोरेखित केले. यावेळी भुजबळ यांनी फुलेवाड्यात पूजा करण्याच्या मुद्द्यावरही भाष्य केले. ते म्हणाले की, संबंधित भगिनींबद्दल आदर असला तरी, प्रत्येक ऐतिहासिक स्मारकाची स्वतःची ओळख आणि पवित्रता असते. अशा ठिकाणी कोणते उपक्रम राबवणे योग्य आहे, याचा विचार करणे आवश्यक आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नसला तरी, सुशिक्षित व्यक्तींनी यावर संवेदनशीलतेने विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. ‘झेन-जी’ संदर्भात सुरू असलेल्या चर्चेवर बोलताना भुजबळ म्हणाले की, ‘कोण बाबा काय म्हणाला, त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही.’ सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंनी आपापले मुद्दे मांडत असल्याचे त्यांनी नमूद केले. पुणे महापालिकेच्या कामकाजाबद्दल बोलताना, भुजबळ यांनी शहरात कामे अपेक्षित वेगाने होत नसल्याचे निरीक्षण नोंदवले. आपण संपूर्ण शहरात फिरलो नसलो तरी, कामांची गती समाधानकारक नसल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चेवर भुजबळ यांनी सावध भूमिका घेतली. ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पक्षाच्या अध्यक्ष असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. राजकीय नेते एकमेकांना भेटत असतात; मात्र माध्यमांकडून सुरू असलेल्या चर्चांना सध्या महत्त्व देण्याची गरज नाही. लोकशाहीत संवाद महत्त्वाचा असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत सरकार योग्य तो निर्णय घेईल, असेही भुजबळ यांनी यावेळी नमूद केले.
Source link
फुलेवाड्याचे विस्तारीकरण समाधानकारक नाही:सरकार जागा देण्यास तयार, कामाला गती देण्याची गरज – मंत्री छगन भुजबळ