मुंबई6 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील ‘प्रतिसरकार’च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. ‘पत्री सरकार 1942’ या ऐतिहासिक मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून, त्यातून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या स्वातंत्र्य चळवळीची झलक पाहायला मिळत आहे. पोस्टर समोर आल्यानंतर इतिहासप्रेमी आणि चित्रपट रसिकांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.
१९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या काळात सातारा परिसरात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘प्रतिसरकार’ची स्थापना झाली होती. ब्रिटिशांच्या सत्तेला थेट आव्हान देत या चळवळीने स्वातंत्र्यलढ्याला नवे बळ दिले. या ऐतिहासिक संघर्षात क्रांती अग्रणी जी. डी. लाड, क्रांतिवीर नागनाथ नायकवडी यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिश राजवट, सावकारशाही आणि अन्यायाविरोधात सशस्त्र लढा उभारला होता.
या संघर्षाची दखल तत्कालीन ब्रिटिश प्रशासनालाही घ्यावी लागली होती. त्या काळातील अनेक ज्ञात आणि दुर्लक्षित राहिलेल्या क्रांतिकारकांच्या शौर्यगाथा या चित्रपटातून उलगडणार आहेत.

पोस्टरमधून झळकला संघर्षाचा आवेश
चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये हातात बंदूक घेतलेला क्रांतिकारक, घोड्यावर स्वार योद्धा आणि ब्रिटिश सैनिकांमधील संघर्ष प्रभावीपणे साकारण्यात आला आहे. ज्वाळा, धुराचे लोट आणि युद्धजन्य वातावरणामुळे स्वातंत्र्यलढ्याची तीव्रता आणि त्या काळातील संघर्षाचे वास्तव पोस्टरमधून जाणवते. त्यामुळे हा चित्रपट ऐतिहासिक घटनांना भव्य सिनेमॅटिक स्वरूपात मांडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
निर्मितीपासून संगीतापर्यंत अनुभवी टीम
‘भागीरथी मोशन पिक्चर’ प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती विशाल गोविंदराव जाधव यांनी केली आहे. चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन, गीतलेखन आणि संगीताची जबाबदारी मनीष अनसुरकर यांनी सांभाळली आहे.
चित्रपटाचे संकलन कर्तव्य मोकल यांनी केले असून, संदीप वाटवे, सुमेध मराठे आणि परमहंस पाठक यांनी छायाचित्रणाची धुरा सांभाळली आहे. सौरभ लता शिवकुमार यांनी पार्श्वसंगीत दिले असून, विशाल जाधव, गोरख गुंजाळ, अनन्या नाईक आणि आनंद मेनन यांच्या आवाजात चित्रपटातील गीते स्वरबद्ध करण्यात आली आहेत.
‘इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न’
चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक मनीष अनसुरकर यांनी सांगितले की, ब्रिटिश राजवटीविरोधात महाराष्ट्राच्या मातीत उभी राहिलेली क्रांती आणि तिच्यामागील प्रेरणादायी इतिहास मोठ्या पडद्यावर प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारख्या महान स्वातंत्र्यसैनिकाचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मोठी असल्याचे त्यांनी नमूद केले.
गीत, संगीत, लेखन आणि दिग्दर्शन या सर्व जबाबदाऱ्या एकाचवेळी सांभाळताना संपूर्ण टीमने अथक मेहनत घेतल्याचे सांगत, पोस्टरनंतर लवकरच टीझर आणि ट्रेलरमधून चित्रपटाची आणखी एक झलक प्रेक्षकांसमोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्वातंत्र्यलढ्याचा विस्मृतीत गेलेला अध्याय मोठ्या पडद्यावर
महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचा पण तुलनेने कमी चर्चिला गेलेला ‘प्रतिसरकार’चा इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. क्रांतिकारकांचे शौर्य, त्याग आणि ब्रिटिशांविरोधातील लढ्याची प्रेरणादायी कहाणी उलगडणारा ‘पत्री सरकार 1942’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हे ही वाचा…
‘मी थोडाफार तरुण हृतिक रोशनसारखा दिसतो’:सौरव दास म्हणाले- मित्राने तुलना केली, कंगनासोबत कॉफीसाठी जायला तयार

भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्यासोबत सुरू असलेल्या शाब्दिक युद्धात/वादादरम्यान, सीजेपी प्रवक्ते सौरभ दास म्हणाले की, त्यांच्या एका मित्राने त्यांना सांगितले की ते तरुण हृतिक रोशनसारखे दिसतात.
खरं तर, ‘द मोजो स्टोरी’वर पत्रकार बरखा दत्त यांच्याशी बोलताना सौरभ म्हणाले की, त्यांच्या मनात कंगनाबद्दल कोणतीही वैयक्तिक दुश्मनी नाही. सौरभ म्हणाले की, त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारेही कंगनाला शांत राहून बसून चर्चा करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या मते, मतभेद संवादाने सोडवले पाहिजेत, कारण देशात चर्चा आणि वादविवादाची संस्कृती सातत्याने कमकुवत होत आहे. सविस्तर वाचा…