![]()
हिंगोली तालुक्यातील नर्सी येथे ११ केव्ही फिडर बसविण्याचे काम प्रशाकिय मान्यतेनुसार झाले नसतांनाही कामाचे ५० लाख रुपयांचे देयक अदा करणारे अधिक्षक अभियंता आर. एम. चव्हाण यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्या निलंबनाचे आदेश गुरुवारी ता. ३० वीज कपंनीचे सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय औंढेकर यांनी काढले आहेत. मात्र या प्रकरणात वीज कंपनीकडून कामालीची गोपनियता पाळली जात आहे. हिंगोलीचे वीज कंपनीचे कार्यालय मागील काही वर्षांपासून या ना त्या कारणावरून गाजत आहे. यापुर्वी वीज कंपनीच्या कार्यालयामार्फत केल्या जाणाऱ्या रोहित्र बसविण्याचे प्रकरण गाजले होते. यामध्ये बीआयएस स्टँडर्डचे रोहित्र बसविण्यात आले नाही. या संदर्भातील अहवाल देखील छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशीक अभियंता कार्यालयाकडे पाठविला होता. मात्र सदर अहवालावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. याप्रकरणात वसमत येथील एका राजकिय पक्षाच्या कार्यकर्त्याने प्रकरणात तडजोड केली होती. त्यानंतर आता रोहित्र बसविण्याचे कामही केले जात असून काही ठिकाणी हि कामे निकृष्ठ दर्जाची होत आहे. एवढेच नव्हे तर सेनगाव तालुक्यात एका शेतात अनाधिकृतरित्या रोहित्र बसवून वीज वाहिन्या देखील अंथरण्याचा प्रकार उघड झाला.या प्रकरणी एकाव्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची अद्यापही चौकशी सुरुच आहे. दरम्यान, आता जिल्हा नियोजन समितीमधून नर्सी नामदेव येथे ११ केव्ही फिडर बसविण्याचे काम सन २०२५-२६ मंजूर करण्यात आले आहे. या कामांचे कार्यारंभ आदेश ता. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी देण्यात आले. सदर काम ए. आर. इलेक्ट्रीकल्स ॲड इंजिनियर्स या कंत्राटदारास देण्यात आले. सदर ठेकेदाराने ता. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी ५०.३७ लाख रुपये रकमेचे देयक सादर केले. त्यामध्ये अधिक्षक अभियंता चव्हाण यांनी काम पूर्ण झाल्याचे प्रमाणीत केले अन देयक अदा केले. या प्रकरणात मंजूर अंदाजपत्रक व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या प्रशासकि मान्यतेप्रमाणे सदर काम झाले नस्याचे निदर्शनास आले असून यावरून पायाभुत सुविधा उभारणीसाठी देण्यात आलेल्या या निधीचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर निंलबनाची कारवाई करण्यात आली आहे. अन्य दोन अभियंत्यांनाही केले निलंबित या प्रकरणात अन्य दोन अभियंत्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये अभियंता सचिन बेलसरे, तत्कालीन अभियंता रंजीत देशमुख यांचा समावेश असल्याचे सुत्रांनी सांगितले. मात्र या कारवाईला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
Source link
प्रशासकीय मान्यतेनुसार काम झाले नसल्याचा ठपका:हिंगोलीतील वीज कंपनीचे अधिक्षक अभियंता आर. एम. चव्हाण निलंबित