सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गुरुवारी (३० जुलै) सायंकाळी प्रथमच धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडण्यात आले. यामुळे कोय
.
कोयना धरण व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ५ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे प्रत्येकी एक फूट उघडण्यात आले. या दरवाजांमधून ५,०७९ क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
याशिवाय धरणाच्या पायथा विद्युतगृहातील एक युनिट कार्यान्वित असून, त्याद्वारे आणखी १,०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोयना नदीमध्ये सध्या एकूण ६,१२९ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.
पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग वाढण्याची शक्यता
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात पावसाची तीव्रता आणि धरणात होणारी आवक लक्षात घेऊन सांडव्यावरील विसर्गात वाढ करण्याची शक्यता असल्याचे धरण व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे.
नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
कोयना धरणातून पाणी सोडल्यामुळे नदीची पाणीपातळी वाढणार असल्याने नदीपात्र आणि नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन सिंचन विभागाने केले आहे.
नदीपात्रात किंवा पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे, तसेच नदीकिनारी असलेल्या गावांच्या ग्रामपंचायती, स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कोयना सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी म्हटले आहे.
प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर लक्ष
धरणातील पाणीसाठा, पावसाची तीव्रता आणि नदीतील विसर्ग यावर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
हे ही वाचा…
विदर्भ, मराठवाड्यात पुढील 24 तासांत ‘फ्लॅश फ्लड’चा इशारा:नदी-नाल्यांना अचानक पूर येण्याची शक्यता; हवामान विभागाचा अलर्ट

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) नवी दिल्ली येथील ‘फ्लॅश फ्लड गायडन्स सेल’ने ३० जुलै २०२६ रोजी एक राष्ट्रीय बुलेटिन जारी केले आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या मध्य प्रदेश व गुजरातच्या सीमेवरील काही भागांत पुढील २४ तासांत ‘फ्लॅश फ्लड’ म्हणजेच अचानक पूर येण्याचा मोठा धोका वर्तवण्यात आला आहे. हा इशारा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. सविस्तर वाचा…