![]()
पिंपरी गावातून गाय चोरी करणाऱ्या टोळीचे ‘कुर्ला कनेक्शन’ उघड झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत पिंपरी पोलिसांनी मुंबईतील कुर्ला येथून एका आरोपीला अटक केली आहे. कादिर अन्सारी (रा. कुर्ला, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अभिजित ज्ञानेश्वर शिंदे (वय ३७, रा. पिंपरीगाव) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली होती. त्यानुसार, तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरीतील रेणुका कडबाकुट्टी केंद्राजवळ सोमवारी (दि. २७) रात्री ही घटना घडली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ‘रिट्झ’ कारमधून तीन व्यक्ती उतरल्याचे दिसून आले. एका आरोपीने गायीच्या मानेत गुंगीचे इंजेक्शन दिले, त्यानंतर बाटलीतील गुंगीकारक द्रव्य पाजले. गाय शांत होताच तिघांनी तिला कारमध्ये टाकून पळ काढला. सीसीटीव्ही फुटेजमधील ‘रिट्झ’ कारचा माग काढल्यानंतर ती मुंबईतील कुर्ला परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. पिंपरी पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या मदतीने वाहनाशी संबंधित माहिती मिळवून आरोपी कादिर अन्सारीला ताब्यात घेतले. पोलिस आता त्याच्याकडून साथीदारांचा शोध, चोरीस गेलेल्या गायीची विल्हेवाट आणि यापूर्वी केलेल्या तत्सम गुन्ह्यांबाबत चौकशी करत आहेत. या टोळीने यापूर्वीही अशाच प्रकारच्या गायचोरी केल्याचा पोलिसांना संशय आहे. दुचाकी चोरून चोरटा पसार दुचाकी चालविताना अचानक चक्कर आल्याने तरुणाने दुचाकी रस्त्याच्या कडेला लावली. दुचाकीला चावी तशीच होती. तरुणाचे लक्ष नसल्याची संधी साधून दुचाकी चोरुन चोरटा पसार झाल्याची घटना जंगली महाराज रस्त्यावर नुकतीच घडली. याबाबत एका तरुणाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण नऱ्हे परिसरात राहायला आहे. दुचाकीस्वार तरुण जंगली महाराज रस्त्यावरुन निघाला होता. मॉडर्न शाळेसमोर दुचाकीस्वार तरुणाला चक्कर आली. त्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला लावली आणि पदपथावरील बाकावर तो बसला. दुचाकीला चावी तशीच होती. तरुणाचे लक्ष नसल्याची संधी साधून दुचाकी चोरुन चोरटा पसार झाला. सहायक पोलिस निरीक्षक एस. एस . जाधव तपास करत आहेत.
Source link
पिंपरीतील गाय चोरी प्रकरणी आरोपी कुर्ल्यातून अटक:सीसीटीव्ही फुटेजमुळे 'कुर्ला कनेक्शन' उघड, पुढील तपास सुरू