![]()
नागपूर जिल्हा न्यायालयात एका गंभीर हत्याकांडातील मुख्य साक्षीदाराने धक्कादायक खुलासा केला आहे. त्याला घरातून अपहरण करून रात्रभर डांबून ठेवल्याचे, मारहाण केल्याचे आणि खोटी साक्ष देण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे त्याने न्यायाधीशांसमोर सांगितले. या कटात एका नामांकित फौजदारी वकिलाचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. सी. मुनघाटे यांच्या न्यायालयात साक्ष देण्यासाठी उभे असताना, साक्षीदाराने काल रात्रीपासून आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार न्यायाधीशांना सांगितला. त्याच्या या गौप्यस्फोटाने न्यायालयीन वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, न्यायालयाने क्षणाचाही विलंब न लावता नागपूर ग्रामीण पोलिसांना तत्काळ एफआयआर नोंदवण्याचे आणि कारवाईचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या कटात सहभागी असलेल्या फौजदारी वकिलासह चारही आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत साक्षीदाराच्या जिवाला धोका असल्याने त्याला चोख पोलीस संरक्षण पुरवण्याचे स्पष्ट निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. ही संपूर्ण घटना उमरेड (जि. नागपूर) येथील २०२२ मध्ये घडलेल्या एका हत्येच्या खटल्याशी संबंधित आहे. २८ जुलैच्या रात्री आरोपी राकेश महाकाळकर याने आपल्या साथीदारांसह मुख्य प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला त्याच्या घरातून बळजबरीने गाडीत कोंबले. त्याला एका कारमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरवून रात्रभर डांबून ठेवण्यात आले. यावेळी त्याला बेदम मारहाण करत बळजबरीने दारू पाजण्यात आली. मूळ आरोपीला निर्दोष सोडवण्यासाठी पोलिसांनी घेतलेला जुना जबाब मागे घेण्यास सांगण्यात आले. ‘मला या प्रकरणातील काहीही आठवत नाही,’ अशी खोटी साक्ष न्यायालयात देण्यासाठी त्याच्यावर सतत दबाव आणला जात होता.
Source link
खोटी साक्ष देण्यासाठी वकिलाचा दबाव:अपहरण करून जीवे मारण्याची धमकी, साक्षीदाराचा नागपूर न्यायालयात गौप्यस्फोट