Headlines

यशाधिपती : इंजिनिअरिंग सोडलं, परदेशातील शिक्षण अर्धवट सोडलं:‘व्होग इटालिया’च्या कव्हरपर्यंत पोहोचलेला सुशांतचा भन्नाट प्रवास




मूळ नांदेड…पण वडिलांना सरकारी नोकरी असल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात वास्तव्य…सततच्या ट्रान्स्फरमुळे स्थिर शाळा देखील नव्हती. अशातच वडिलांनी सातवी वर्गात असतांना एक कॅमेरा आणून दिला आणि त्याच्यासोबत एवढं घट्ट नातं जडलं की आज तो त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालाय. यशाधिपती मालिकेच्या आजच्या भागात जाणून घेऊयात स्वभावाने अतिशय शांत आणि आगळ्या-वेगळ्या असलेल्या ‘सुशांत देशमुख’ यांची कहाणी. कलात्मक वातावरणात वाढलेले सुशांत. घरातील जवळ-जवळ सगळ्यानांच वाचन, संगीत, सिनेमा यामध्ये गोडी. त्यामुळे हे कलागुण सुशांतमध्ये न येणं म्हणजे नवलच. लहान असतांना वडिलांनी कॅमेरा आणून दिला. त्यामुळे जिथं कुठं फिरायला वगैरे जायचं असेल तिथे सुशांत फोटो काढण्यासाठी पुढे असायचे. तिथूनच फोटोची भाषा, निसर्गाचं सौंदर्य, त्यातील बारकाई यामध्ये त्यांना गोडी निर्माण झाली. हळूहळू याच आवडीने त्यांची जगाशी ओळख करून दिली. यावर बोलताना सुशांत म्हणतात, ‘घरामध्ये सगळ्यानांच कलेची फार आवड. त्यामुळं मलाही ती लागली. कुठलंही आर्ट मीडियम हे त्याच्या परिघापुरतं मर्यादित नसतं. त्यामध्ये अनेक गोष्टींचं कॉम्बिनेशन होऊन मग ते क्रिएट होतं. तसंच माझ्याबाबतीत झालं. यासाठी मी माझ्या जन्मदात्यांचा ऋणी आहे.’ सुशांत सांगतात की,’माझी दहावी झाल्यानंतर मला आवड म्हणून बाबांनी मला DSLR कॅमेरा घेऊन दिला. तशी त्यांनी माझी आवड नेहमीच जोपासली. तो कॅमेरा आल्यावर मी माझ्या दीड वर्षाच्या बहिणीचे फोटो काढले. ते फोटो तेव्हा खूप छान आलेले. ती माझा पहिला ऑब्जेक्टच. जिला मी कॅप्चर केलं. त्यानंतर मला कळालं की मी हे करू शकतो.’ कॅमेरा हातात आला तेव्हा आपण कधी यामध्येच करिअर करू असं कधी सुशांत यांना वाटलं नव्हतं. सुरुवातीला केवळ फोटो काढण्याची आवड असलेल्या सुशांत यांना हळूहळू त्या माध्यमामागचं जग समजायला लागलं. एखादा फोटो सुंदर दिसतो म्हणजे केवळ कॅमेऱ्याची कमाल नसते, तर त्यामागे असतो तो क्षण टिपण्याचा दृष्टिकोन. प्रकाश कुठून येतोय, एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा भाव कसा पकडायचा, निसर्गाकडं कोणत्या कोनातून पाहायचं, याचा विचार ते करू लागले. पुढं याच आवडीला करिअर बनवण्याचा निर्णय घेतला. मात्र, फोटोग्राफीला आयुष्य बनवण्यासाठी घरच्यांनी विरोध केला. त्यामुळे सुशांत यांनी इंजिनिअरिंगकडं वळण्याचा निर्णय घेतला. यावर बोलताना ते सांगतात, ‘घरच्यांच्या म्हणण्यानुसार मी इंजिनिअरिंगला इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनला ॲडमिशन घेतलं. पण त्यामध्ये माझं मन लागत नव्हतं म्हणून ते मी सोडून दिलं. त्यावेळी बाबांनी मला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आमच्यात थोडे वादही झाले. तो खूप कठीण प्रसंग होता. पण नंतर त्यांनी मला थोडं समजून घेतलं.’ त्यानंतर सुशांत यांनी फोटोग्राफीकडं वळण्याचा निर्णय घेतला. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये मेजर इन फिजिक्स अँड मायनर इन फोटोग्राफी या विषयाची निवड केली. त्यातच ग्रॅज्युएशन केलं. या दरम्यान त्यांनी UPSC ची पण एक वर्ष तयारी केली. मात्र, तिथंही मन रमलं नाही. म्हणून वडिलांना स्पष्टच सांगून दिल की ‘माझ्याकडून हे सगळं होणार नाही. मला फोटोग्राफीमध्येच आवड आहे. त्यातच मला पुढे जायचंय.’ Czech Republic मध्ये मनासारखं शिकायला नाही भेटलं ! याबद्दल सुशांत सांगतात, ‘वडिलांना स्प्ष्ट सांगितल्यानंतर त्यांनी माझा निर्णय मान्य केला. त्यानंतर मी मास्टर करण्यासाठी Czech Republic येथे गेलो. तिथं माझं नॅशनल स्कूलमध्ये सिलेक्शन झालं. मात्र मी तिथं फक्त एक सेमिस्टरच राहिलो. कारण जेवढे मी पैसे भरत होतो, तेवढं मला तिथं शिकायला मिळत नव्हतं. माझ्या मनासारखा तिथं रिझल्ट येत नव्हता. त्यामुळं मी विचार केला, की मी जर प्रॅक्टिकली काम करायला सुरुवात केली, तर त्यातून मला शिकायला मिळेल. मग ते सोडून मुंबईला वापस आलो. इथं आल्यावर मी काही फोटोग्राफरला असिस्ट केलं. जे नावाजलेले होते. तो माझा चांगला निर्णय होता असं मला आता वाटतं. कारण त्यावेळी जर मी तिथे थांबलो असतो, तर मला शिकायला काहीच मिळालं नसतं.’ परदेशात जाऊन शिकण्याचं स्वप्न अनेक तरुण पाहतात. मोठ्या विद्यापीठात प्रवेश मिळणं, वेगळ्या देशात राहणं आणि तिथल्या नव्या जगाचा अनुभव घेणं, हे नक्कीच आकर्षक असतं. मात्र, परदेशात गेल्यानंतरची परिस्थिती प्रत्यक्षात अनेकदा वेगळी असते. आपल्या अपेक्षा, आपण भरलेली फी आणि तिथून मिळणारं शिक्षण यांचा मेळ बसेलच असं नाही. सुशांत यांच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. परदेशात राहणं हा त्यांच्यासाठी अनुभव होता; मात्र आपल्या कलेत पुढं जाण्यासाठी प्रत्यक्ष कामातून शिकणं अधिक महत्त्वाचंय, हे त्यांना तिथंच जाणवलं. ते करू शकतात तर मग आपण का नाही…? सुशांत यांच्या फोटोग्राफीला तर सुरुवात झाली. मात्र, म्हणावं तस काम येत नव्हतं. याबद्दल ते सांगतात, ‘तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात आणि तुमचं सध्याचं जे स्किल आहे त्याच्यात जोपर्यंत जास्त-जास्त अंतर असेल ना, तर ते कुठेतरी फ्रस्ट्रेशनमध्ये जातं. म्हणजे असं वाटायला लागत की यार आपण का करू शकत नाही. पण मग माझे जे फेव्हरेट आर्टिस्ट आहेत ना त्यांच्याकडे बघून मला हे नेहमीच वाटायचं, की ते करू शकतात तर मग आपण का नाही…? त्यामुळं मग त्यांच्याकडं बघून स्वतःला मोटिवेट करायला लागलो. त्याप्रमाणे आजही मी काम करतो.’ हळूहळू सुशांत यांना जाणवू लागलं की, फोटोग्राफीमध्ये केवळ आवड असून भागणार नाही; त्यासाठी सतत शिकणं, प्रयोग करणं आणि स्वतःच्या चुका स्वीकारणंही तितकंच गरजेचंय. त्यामुळं प्रत्येक कामाकडं ते एक नवा धडा म्हणून पाहू लागले. मिळालेल्या प्रत्येक संधीमधून काहीतरी वेगळं शिकण्याचा त्यांचा प्रयत्न सुरूच राहिला. आणि याच काळात त्यांच्या फोटोग्राफीच्या प्रवासाला एक वेगळी दिशा मिळू लागली. मॉडेलिंग फोटोग्राफीच का? फोटोग्राफीमध्ये अनके प्रकार पडतात. त्या-त्या प्रकारचे फोटोग्राफरही असतात. सुशांत यांनी आपल्या करिअरसाठी मॉडेलिंग निवडली. सुशांत सांगतात की,’फोटोग्राफी ही एक दृश्यशैली आहे. त्यामध्ये रंग, रूप, शेप यांच्यासोबत खेळायचं असतं. मॉडेलिंगमध्ये जास्त क्रिएटिव्ह गोष्टी करता येतात. तस वाईल्ड लाइफ फोटोग्राफीमध्ये बघितलं तर त्यामध्ये पेशन्स अधिक असणं गरजेचं आहे. इथे सगळा टाइमिंगवरचा खेळ असतो. मात्र मॉडेलिंगमध्ये तस नाहीये. तुम्ही स्वतःहून तुमचं कौशल्य इथे दाखवू शकता. समोरचा ऑब्जेक्ट कशा पद्धतीनं बसला पाहिजे इथंपासून तुम्ही तुमची कला दाखवता. बाकी पण प्रकार क्रिएटिव्ह आहेत. मात्र माझ्यासाठी मॉडेलिंग, फॅशन फोटोग्राफी अधिक चांगलीय.’ सुशांत केवळ मॉडेलिंग पुरतेच मर्यादित नाहीत. तर ते डॉक्युमेंटरी फोटोग्राफी देखील करतात. त्यांनी सध्या ‘सोंगाड्या’ म्हणून एक डॉक्युमेंटरी केलीय. ज्यामध्ये त्यांनी गावाकडचं लाइफ, तिथली संस्कृती, कला- प्रकार दाखवण्याचा प्रयत्न केलाय. सुशांत यांनी आतापर्यंत अनेक प्रोजेक्टवर काम केलंय. त्यातील सर्वात जास्त आवडलेलं फोटोशूट म्हणजे गुजरातचं. सुशांत सांगतात, ‘माझ्या फोटोग्राफी मध्ये स्वतःकड़ून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. पण त्यातल्या त्यात मी रिसेन्टली गुजरातमधील कच्छ येथील भुज या गावातील ट्रेडिशन आरटीजन्स आहेत त्यांच्यावर काम केलं. ते टेक्सटाइलवर काम करणारे म्हणजे बांधणी वगैरे बनवणारे आर्टिस्टयत. आर्किटेक्चरल डायजेस्ट इंडियासाठी मी ही सीरिज केलीय. तर ती एक मला आवडते. पण मला अजून खूप काही शिकायचंय. मी काढलेला फोटो बघून समोरचा व्यक्ती थोड्यावेळासाठी स्तब्ध झाला पाहिजे. हे मला मिळवायचंय.’ माझं आजोबांशी एक वेगळं नातं होतं…! सुशांत यांचं आजोबांशी अत्यंत घट्ट नातं होतं. त्यामुळे त्यांची एक आठवण म्हणून सुशांत यांनी त्यांचा हाताचा एक फोटो काढून ठेवला होता. तो फोटो ‘व्होग इटालिया’ या मासिकाच्या कव्हर पेजवर लागला. हा किस्सा शेअर करताना सुशांत सांगतात, ‘माझं माझ्या आजोबांसोबत खूप चांगलं नातं होतं. मी लहान असतांना आजोबा आमच्याकडे वर्षातून दोनदा यायचे. त्यामुळे मला ते आले की खूप आनंद व्हायचा. कारण म्हणजे ते असं छोट्या-छोट्या गोष्टींची कौतुक करायचे ते मला आवडायचं. ते आले की झोपण्यासाठी गाद्या टाकल्या जायच्या. मग मी त्यावरून उड्या वगैरे मारायचो. मज्जा यायची मला. हा किस्सा मला अजूनही आनंद देऊन जातो. कालांतराने मी जसा मोठा होत गेलो. तसं मला माझ्यात आणि बापूमध्ये साम्य वाटायला लागलं. त्यांचा हात आणि माझा हात यामध्ये थोडंफार साम्य वाटायचं. पण ज्यावेळेस मला हे कळालं तेव्हा त्यांचं वय खूप जास्त होतं. तेव्हाच मी ठरवलं की आजोबांची एक आठवण मला डॉक्युमेंट म्हणून ठेवायचीय. म्हणून मग मी त्यांच्या हाताचा एक फोटो काढला आणि मी जेव्हा मास्टरसाठी गेलो, तेव्हा तिथं पोर्टफोलिओमध्ये जी सीरिज केली त्यात तो टाकला. तोच नंतर ‘व्होग इटालिया’ मासिकाचं कव्हर पेज बनलं.’ एक साधी आठवण जपण्यासाठी काढलेला तो फोटो पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवरील मासिकाच्या कव्हरवर झळकला. मात्र, सुशांतसाठी त्याची किंमत केवळ ‘व्होग इटालिया’च्या कव्हरपुरती मर्यादित नाही. कारण त्या फोटोमध्ये त्यांच्या आजोबांची आठवण, त्यांच्याशी असलेलं नातं आणि स्वतःच्या मुळांशी जोडलेली एक भावनिक गोष्टय. एखाद्या व्यक्तीचा चेहरा किंवा एखादं सुंदर दृश्य टिपण्यापेक्षा त्यामागची गोष्ट कॅमेऱ्यात बंदिस्त करणं, हीच कदाचित सुशांतच्या फोटोग्राफीची खरी ताकदय. AI मुळे फोटोग्राफीवरही परिणाम झाला आहे AI च्या येण्यामुळं प्रत्येक क्षेत्राला झळ बसलीय. तसाच परिणाम फोटाग्राफीवरही झालाय. यावर बोलताना सुशांत सांगतात, ‘मधल्या काळात एका Mango या ब्रँडने एक कॅम्पेन आणले होते. त्यामध्ये त्यांनी पूर्णपणे AI चा वापर करून फोटो तयार केले होते. म्हणजे ते बघून असं वाटत नव्हतं की ते AI ने बनवलंय. तोपर्यंत आम्ही अशा भ्रमात होतो, की यार AI नं जरी तयार केलं असेल, तर त्यामध्ये काही ना कमी असेलच. पण या कॅम्पेनमध्ये ते ओळखताच आलं नव्हतं. त्याचं कॅप्शन वाचल्यावर लक्षात आलं की हे AI ने बनवलंय. ती एक घटना आमच्यासाठी भीतीदायक होती, की कुठेतरी आमचं अस्तित्व धोक्यातय.’ पुढे ते सांगतात, ‘याचदरम्यान मला असं वाटत की एक ह्युमन क्रिएटिव्ह पोटेन्शिअल आहे. त्याला मॅच करण अजूनपर्यंत AI ला जमलं नाहीय. जर तुम्हाला माहित असेल की तुम्हाला काय क्रिएट करायचंय, त्यासाठी तुम्ही AI चा वापर करू शकता. तो एक ॲडॉप्ट करण्याचा पार्टय. प्रॉम्प्ट देण्यासाठी सुद्धा व्यक्तीच लागतो. AI च्या मदतीने कॅमेरा अँगल बघण्यापेक्षा तुमच्या डोक्यात जर व्हिज्यूअल क्लिअर असेल तर ते अधिक सोपं जात.’ एकाच रूममध्ये 8-10 जण राहायचो! सुशांत यांच्या आयुष्यात अनेक चढ -उतार आले. मात्र, त्यांनी कधी हार मानली नाही. याचा किस्सा ते सांगतात, ‘इटलीला मी जेव्हा इंटर्नशिपसाठी गेलो, तिथं साइड बाय साइड काम सुरू केलेलं. तेव्हा मिलानमध्ये असताना खूप जास्त थंडी होती. आपल्याला एवढी थंडी सहन नाही होत. त्यावेळी तुम्ही खूप जास्त डिप्रेशनमध्ये असता. तेव्हा बाहेर पाऊस होता आणि मी एका घाणेरड्या हॉस्टेलमध्ये राहायला होतो. जिथे बाथरूमचा वास येतोय, कुठलीही सोय नाहीय. एका रूममध्ये तब्ब्ल आठ-दहा जण कोंबलेले. तिथं मी कामासाठी गेलो होतो. मी रात्री रूमबाहेर पडलो. तेव्हा माझ्या फेव्हरेट आर्टिस्टचं गाणं ऐकत मी रस्त्यावरून चालत होतो. मला चालता- चालताच रडायला आलं.’ सुशांत पुढे म्हणाले, ‘मी जो काही अनुभव घेत होतो, तो माझ्यासाठी खूप वेगळा होता. मी तिथे एकटाच आहे, मी काय करतोय? असे प्रश्न मला पडू लागले होते. पण नंतर मी स्वतःला समजावले आणि पुढे जाण्याचा निर्णय घेतला.’ सुशांत सांगतात की, ‘जर तुम्हाला या क्षेत्रात यायचं असेल तर तुम्हाला मनाने आधी तयार व्हायला पाहिजे. तुमच्याकडे एक युनिक रिजन असलं पाहिजे. तेव्हाच तुम्ही या क्षेत्रात पुढे जाऊ शकता. फोटोग्राफीच्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी सुशांतचा प्रवास अनेक गोष्टी शिकवणारा आहे. या क्षेत्रात केवळ टॅलेंट पुरेसं नसतं, तर सातत्य, संयम आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची तयारीही असावी लागते. प्रत्येक रिजेक्शननंतर पुन्हा उभं राहण्याची ताकद असेल, तरच या क्षेत्रात टिकता येतं.’ आज कॅमेऱ्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांकडं पाहताना त्यांची स्वतःची एक व्हिज्युअल लँग्वेज तयार होतेय. मॉडेलिंगपासून डॉक्युमेंटरीपर्यंत आणि फॅशनपासून संस्कृतीपर्यंतचा हा प्रवास त्यांना सतत नवे प्रयोग करण्याची प्रेरणा देतोय. उद्या कॅमेऱ्यातून नेमकं काय टिपायचं, हे कदाचित आज ठरलेलं नसेल. मात्र, प्रत्येक नव्या प्रोजेक्टसोबत काहीतरी वेगळं शोधण्याची त्यांची धडपड सुरूचय. सातवीत वडिलांनी हातात दिलेला कॅमेरा आज त्यांच्या हातात केवळ एक साधन राहिलेला नाही, तर जगाकडे पाहण्याची त्यांची स्वतःची नजर झालाय. या नजरेतून अजून किती कथा, किती चेहरे आणि किती क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त होणारयत, याचं उत्तर भविष्यातल्या प्रत्येक नव्या क्लिकमध्ये दडलंय.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *