![]()
लोहगडावरून ४०० फूट खोल दरीत पडून झालेला बिल्डर केतन अग्रवाल याचा मृत्यू हा साधा अपघात नव्हता, तर ती अत्यंत थंड डोक्याने रचलेली हत्या होती. पुणे ग्रामीण पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) या प्रकरणाचा छडा लावला असून वडगाव मावळ न्यायालयात ५ हजार ५३ पानांचे भक्कम दोषारोपपत्र दाखल केले आहे. या गुन्ह्यात सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हंगे यांच्यावर कट रचणे आणि हत्या केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. केतनला लोहगडावर बोलावण्यासाठी आरोपींनी एक डाव रचला. चेतन आणि सिया यांनी फेसबुकवर ‘माही’ नावाने एक बनावट अकाउंट तयार केले. विश्वास बसावा म्हणून सियाने या अकाउंटवर स्वतःच्या एका मैत्रिणीचा फोटो लावला. या अकाउंटवरून केतनशी चॅटिंग करून ओळख वाढवण्यात आली. कोणताही संशय न येऊ देता याच “माही’ अकाउंटवरून केतनला लोहगडावर बोलावण्यात आले आणि तिथेच त्याचा काटा काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. रितेश हंगे दोघांचाही मुख्य ‘सल्लागार’ सिया आणि चेतन यांचे एकमेकांवर प्रेम होते, मात्र सियाचा विवाह केतनसोबत ठरला होता. सुरुवातीला केतनला मारहाण करून विवाह पुढे ढकलण्याचा त्यांचा बेत होता. सुपारी देण्याचाही विचार झाला, मात्र नंतर सिया आणि चेतनने स्वतःच कट अमलात आणला. या संपूर्ण कटात चेतनचा मित्र रितेश हंगे हा मुख्य ‘सल्लागार’ होता. गुन्हा करण्यापूर्वी आणि नंतर पोलिसांपासून कसा बचाव करायचा याची माहिती तो देत होता. हत्येच्या दिवशी चेतनने पुण्यातील आंबेगाव परिसरातील “इंजिनिअर कॅफे’ मध्ये रितेशची भेट घेतली, तर सियानेही फोनवरून त्याच्याशी संपर्क साधल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी ८ दिवसांत घेतली २ तास झोप १८ जून रोजी घडलेल्या या घटनेत सुरुवातीला फोटो काढताना पाय घसरून मृत्यू झाल्याचा बनाव रचण्यात आला होता. मात्र, कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली. उपअधीक्षक गजानन टोम्पे आणि सहायक निरीक्षक मनोज पवार यांच्या नेतृत्वाखालील १८ जणांच्या पथकाने तीन महिने सखोल तपास केला. शेवटचे आठ दिवस या पथकाने लोणावळ्यात तळ ठोकून, दिवसाला केवळ दोन तास झोप घेत कागदपत्रांची जुळवाजुळव केल्याचे सांगण्यात आले. राजा रघुवंशी खून प्रकरणातून घेतली प्रेरणा सिया आणि चेतन चौधरी यांनी केतनच्या हत्येचे नियोजन करण्यासाठी जुन्या गुन्ह्यांचा अभ्यास केला होता. राजा रघुवंशी खून प्रकरण आणि मागील वर्षी लोहगड किल्ल्यावरून पडून झालेल्या पिंपरी येथील एका तरुणीच्या मृत्यूच्या घटनेतून त्यांनी केतनच्या हत्येची आणि ती अपघात भासवण्याची प्रेरणा घेतली होती. याशिवाय त्यांनी इतर पर्यायी मार्ग शोधण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
Source link
तीन महिन्यांत तपास:“माही’नामक फेक अकाउंटवरून रचला केतन याच्या हत्येचा कट, 5,053 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल