Headlines

नावाऐवजी 'अस्पष्ट खातेदार' लिहिलेला सात-बारा आढळला:चांदूर बाजार तहसील कार्यालयात विचित्र प्रकार, बोजाही दाखवल्याने महसूल विभागात खळबळ.




अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तहसील कार्यालयात एक विचित्र सात-बारा उतारा समोर आला आहे. यात खातेदाराच्या नावाऐवजी ‘अस्पष्ट खातेदार’ असे लिहिले आहे. विशेष म्हणजे, खातेदाराचे नाव नसतानाही या सात-बारावर बोजा (कर्जाची नोंद) दाखवण्यात आला आहे. या प्रकारामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत. त्यांच्याच जिल्ह्यात असा प्रकार समोर आल्याने शेतकरी हितासाठी काम करणाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. खातेदाराचे नाव नसतानाही बोजाची नोंद असल्याने महसूल विभागाच्या नोंदींच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही जमीन कोणाच्या मालकीची आहे आणि बोजा कोणत्या आधारावर नोंदवला, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. सात-बारा उताऱ्यावर सामान्यतः खातेदाराचे नाव, गट क्रमांक, क्षेत्रफळ आणि जमिनीचा प्रकार यासह इतर नोंदी असतात. या नोंदींच्या आधारेच जमिनीची खरेदी-विक्री, वारस नोंद आणि कर्ज प्रकरणे केली जातात. मात्र, या सात-बारा उताऱ्यावर खातेदाराचे नाव नसून ‘अस्पष्ट खातेदार’ असे लिहिले आहे. खातेदाराचे नाव माहीत नसतानाही बोजाची नोंद कशी झाली, याबाबतही प्रश्न विचारले जात आहेत. ऑनलाइन सात-बारा आणि प्रत्यक्ष अभिलेखांमध्ये काही फरक आहे का, जुन्या नोंदींचे संगणकीकरण करताना चुका झाल्या का, किंवा तांत्रिक चूक झाली का, याची चौकशी करण्याची मागणी नागरिक करत आहेत. महसूल विभागाचा कारभार पारदर्शक करण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. असे असतानाही सात-बारा उताऱ्यावर खातेदाराचे नाव नसणे, ही बाब विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. या चुकीचा फटका संबंधित शेतकऱ्याला सहन करावा लागत असल्याची नाराजीही व्यक्त केली जात आहे. माहितीनुसार, या सात-बारा उताऱ्यावरील मौजा, गट क्रमांक, क्षेत्रफळ आणि जमिनीचा प्रकार एका शेतकऱ्याच्या जमिनीच्या नोंदींशी जुळतो. त्यामुळे हा सात-बारा दुरुस्त करण्यासाठी त्या शेतकऱ्यालाच अर्ज करावा लागेल, असे महसूल विभागाचे म्हणणे आहे. यामुळे चूक महसूल विभागाची असली तरी, त्याचा फटका मात्र शेतकऱ्याला बसत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *