![]()
पुणे फेस्टिव्हल आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या फोटो प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार आणि ‘फ्रेम’ चित्रपटाचे दिग्दर्शक विक्रम पटवर्धन यांच्या हस्ते बालगंधर्व कलादालन येथे हे प्रदर्शन सुरू झाले. यावेळी बोलताना पटवर्धन यांनी ‘अशा प्रदर्शनांमुळे फोटो साक्षरता वाढीस लागेल’ असे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल होते. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश शेळके, सरचिटणीस हिरा सरवदे, पुणे फेस्टिव्हल सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, विश्वस्त मोहन टिल्लू आणि कलादालन समन्वयक सचिन आडेकर मंचावर हजर होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कृष्णकुमार गोयल यांनी सांगितले की, या प्रदर्शनात चांगली आणि निवडक छायाचित्रे आहेत. विषयांमध्येही विविधता आहे. पुढील वर्षापासून हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर करण्याची त्यांची इच्छा आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सदस्य असलेल्या दैनिकांच्या छायाचित्रकारांनी वर्षभरात काढलेल्या न्यूज फोटोंचे हे प्रदर्शन आहे. बालगंधर्व कलादालनात १९ व २० सप्टेंबर रोजी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन खुले राहील. प्रदर्शनात १२x१८ इंच आकाराच्या प्रिंट स्वरूपातील २५० हून अधिक छायाचित्रे आहेत. पत्रकार संघाचे सरचिटणीस हिरा सरवदे आणि राहुल देशमुख यांनी समन्वय केले. या प्रदर्शनातील पहिल्या तीन चांगल्या छायाचित्रांना पुणे फेस्टिव्हलतर्फे क्रमशः दहा हजार, सात हजार आणि पाच हजार रुपये बक्षिसे दिली जातील. याशिवाय एक उत्तेजनार्थ बक्षीस देखील दिले जाईल. बालगंधर्व कलादालनचे पुणे फेस्टिव्हल समन्वयक सचिन आडेकर, आबा जगताप आणि अन्वर शेख यावेळी उपस्थित होते.
Source link
पुणे फेस्टिव्हल आणि पत्रकार संघाच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन:'फोटो साक्षरता वाढीस लागेल' असे विक्रम पटवर्धन म्हणाले; बालगंधर्व कलादालनात 19 व 20 सप्टेंबरला