Headlines

गणेशोत्सवात मेट्रोला प्रवाशांची मोठी पसंती:रात्री 8 वाजेपर्यंत 3.06 लाख प्रवाशांनी केला प्रवास, मंडई स्थानकावर सर्वाधिक गर्दी




गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे मेट्रोला प्रवाशांची मोठी पसंती मिळत आहे. शनिवारी (१९ सप्टेंबर) रात्री ८ वाजेपर्यंत मेट्रोने तब्बल ३ लाख ६ हजार २६८ प्रवाशांनी प्रवास केला. गणेशोत्सवातील गर्दीच्या काळात सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय म्हणून मेट्रोचा वापर वाढत असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे. मेट्रोच्या विविध स्थानकांवर दिवसभर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्यात महात्मा फुले मंडई स्थानकावर सर्वाधिक ३८ हजार ६७७ प्रवाशांची नोंद झाली. त्यापाठोपाठ पीसीएमसी स्थानकावर ३६ हजार ९११, रामवाडी येथे ३० हजार ३५०, तर स्वारगेट स्थानकावर २७ हजार ५०१ प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला. पुणे रेल्वे स्थानकावर १६ हजार ७६८ प्रवाशांची नोंद झाली. गणेशोत्सवात शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर भाविक आणि नागरिकांची गर्दी होत आहे. मंडई, स्वारगेट, पुणे रेल्वे स्थानक यांसारख्या स्थानकांवरून गणेश मंडळे, बाजारपेठा आणि उत्सवाच्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. रस्त्यांवरील वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या आणि गर्दीचा विचार करता मेट्रोचा प्रवास नागरिकांसाठी तुलनेने सोयीचा ठरत आहे. दरम्यान, जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावर मार्गिका बदलणाऱ्या प्रवाशांची संख्या ६६ हजार ४६१ इतकी होती. त्यामुळे या स्थानकाचा मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा दुवा म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे स्पष्ट झाले. गणेशोत्सवाच्या काळात मेट्रोच्या प्रवासी संख्येत झालेली वाढ ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील नागरिकांचा वाढता विश्वास दर्शवणारी ठरत आहे. उत्सवाच्या पुढील दिवसांतही प्रवासी संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *