Headlines

महाराष्ट्राच्या कन्येची स्वीडनच्या संसदेत एन्ट्री:निला विखे-पाटील यांची खासदारपदी निवड; शिक्षणतज्ञ अशोक विखे पाटलांच्या लेकीचे डंका




महाराष्ट्रातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे-पाटील यांच्या कन्या निला विखे-पाटील यांची स्वीडनच्या संसदेत निवड झाली आहे. 13 सप्टेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत त्यांनी ‘स्टॉकहोम सिटी’ मतदारसंघातून विजय मिळवला असून, 349 सदस्य असलेल्या स्वीडिश संसदेत त्या आता देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. “संसदेचा एक भाग होणे ही अतिशय आनंदाची बाब असून, शहर आणि देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी मी उत्सुक आहे. ज्यांना मतदान करता येत नाही त्यांचा आवाज बनण्याची माझी इच्छा असून बाल कल्याण आणि पर्यावरण हे माझे मुख्य विषय असतील,” अशी प्रतिक्रिया 41 वर्षीय निला यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. निला विखे-पाटील या आशियातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या पणती, दिवंगत केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे-पाटील यांच्या नात आणि राज्याचे विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पुतणी आहेत. आपल्या आजोबांच्या आठवणींना उजाळा देताना निला म्हणाल्या, “मला माझ्या आजोबांचा अभिमान वाटेल असे काम करायचे आहे. वयाच्या 15 व्या वर्षी त्यांनी मला राज्याचा अर्थसंकल्प वाचायला लावला होता. शेवटच्या काळात ते मला दर आठवड्याला फोन करायचे. माझे भारतावर आणि येथील माझ्या मित्रांवर प्रचंड प्रेम आहे.” लेकीच्या या ऐतिहासिक यशाबद्दल ‘विखे-पाटील फाउंडेशन’चे अध्यक्ष असलेल्या अशोक विखे-पाटील यांनी मोठा अभिमान व्यक्त केला आहे. निला यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला असला, तरी त्यांची सुरुवातीची काही वर्षे महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये गेली आहेत. त्यांनी ‘गोथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेस’मधून अर्थशास्त्र आणि कायद्याचे शिक्षण घेत एमबीए पूर्ण केले असून, माद्रिदच्या ‘युनिव्हर्सिटी डी कॉम्प्लुटेन्स’मधूनही त्यांनी एमबीएचे शिक्षण घेतले आहे. राजकारणाचा दांडगा अनुभव असलेल्या निला यांनी यापूर्वी स्वीडनचे माजी पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांच्या प्रशासनात वित्त, कर आणि गृहनिर्माण विषयांवर राजकीय सल्लागार म्हणून काम पाहिले आहे. तसेच, त्या स्टॉकहोम महानगरपालिकेच्या नगरसेविका म्हणूनही निवडून आल्या होत्या. त्या ‘ग्रीन पार्टी’च्या अतिशय सक्रिय नेत्या असून पक्षाच्या विविध महत्त्वाच्या समित्यांवर त्यांनी काम केले आहे. नुकत्याच लागलेल्या स्वीडनच्या राष्ट्रीय निवडणुकीच्या निकालानुसार, डाव्या विचारसरणीच्या विरोधी पक्षाने 349 पैकी 176 जागा जिंकून निसटते बहुमत मिळवले आहे. तर मावळत्या पुराणमतवादी सरकारच्या पारड्यात 173 जागा पडल्या आहेत. निला यांचा ‘ग्रीन पक्ष’ हा एक प्रमुख विरोधी पक्ष असून तो प्रामुख्याने पर्यावरणवाद, नवीकरणीय ऊर्जा आणि हरित राजकारणावर लक्ष केंद्रित करतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *