![]()
पुण्याला जागतिक पर्यटन नकाशावर आणण्यासाठी समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक वैभव हे महत्त्वाचे घटक आहेत. पर्यटन धोरणाची प्रभावी अंमलबजावणी आणि पायाभूत सुविधांचा जलद विकास केल्यास पुणे महाराष्ट्राचाच नव्हे, तर भारताचा पर्यटन ब्रँड बनू शकते, असे पर्यटन संचालनालयाच्या पुणे प्रादेशिक विभागाचे उपसंचालक भारत लांघी यांनी शनिवारी सांगितले. लांघी पुणे फेस्टिव्हल आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित एका विशेष पर्यटन परिसंवादात बोलत होते. या परिसंवादात देवम टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे अध्यक्ष नीलेश भन्साळी, पराशर ॲग्री अँड व्हिलेज टूरिझमचे संस्थापक संचालक मनोज हाडवळे आणि वेलनेस टूरिझम तज्ज्ञ डॉ. संतोष सूर्यवंशी यांचाही सहभाग होता. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि जनरल सेक्रेटरी व सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई यांच्या हस्ते सर्व वक्त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मावळ तालुक्यातील दारूंब्रे गावातील आनंदमळा कृषी पर्यटन केंद्राचे समीर वाघोले यांना कृषी पर्यटन क्षेत्रातील चांगल्या कार्यासाठी पुरस्कार देण्यात आला. लांघी यांनी सांगितले की, केंद्र सरकारने २०२० मध्ये पर्यटन धोरण जाहीर केले आहे आणि त्यानुसार काम सुरू आहे. आकडेवारीनुसार, दर दहा रोजगारांपैकी एक रोजगार पर्यटनाशी संबंधित असतो. यावरून पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या किती संधी आहेत, हे लक्षात येते. केंद्रीय पर्यटन धोरणाची अंमलबजावणी महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे सुरू आहे. पुणे हे शिक्षण, वाहन, आयटी आणि आरोग्याचे केंद्र आहेच. पण पर्यटनाच्या दृष्टीने पुण्याचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि समृद्ध संस्कृती यावर लक्ष केंद्रित केल्यास पुण्याचे नाव जागतिक पर्यटन नकाशावर ठळक होईल. यासाठी पायाभूत सुविधांचा विकास, चांगली आणि सुरक्षित निवासव्यवस्था, सुरळीत वाहतूक आणि स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पर्यटन स्थळ म्हणून पुणे आणि परिसरात अनेक क्षमता आहेत. जुन्नर परिसर सातवाहनकालीन वारशासह बौद्ध लेण्यांचे केंद्र म्हणून विकसित करता येईल. याशिवाय साहसी पर्यटनालाही मोठा वाव आहे. आरोग्य, क्रीडा, पुरातत्त्व, दुर्ग, लेणी, धरणे आणि कृषी, ग्राम पर्यटनाचे पर्यायही मोठ्या प्रमाणात वापरले पाहिजेत. यासाठी सरकारी पातळीवर अनेक प्रोत्साहनपर योजना उपलब्ध आहेत. पर्यटन क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांनी या योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घेतला पाहिजे. महिलांसाठी आणि स्टार्टअप्ससाठीही अनेक मदत योजना आहेत. युवकांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पुणे परिसर आणि महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांचा जाणीवपूर्वक प्रचार-प्रसार केला पाहिजे. अशा एकत्रित प्रयत्नांतूनच जागतिक पातळीवर आपले ब्रँडिंग शक्य होईल.
Source link
पुण्याला जागतिक पर्यटन ब्रँड बनवण्यासाठी वारसा महत्त्वाचा:पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक भारत लांघी यांचे प्रतिपादन