![]()
सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या कथित मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून सोलापुरात 26 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सादिया अहमद काजी असे मृत विवाहितेचे नाव आहे. व्यवसायात नुकसान झाल्याचे सांगत माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये, असा तगादा तिच्याकडे लावला जात होता, असा आरोप तिच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत केला आहे. तसेच घरकाम आणि स्वयंपाक येत नसल्याचे सांगून तिला वारंवार टोमणे मारले जात होते. शिवीगाळ आणि मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. ही घटना 17 सप्टेंबर 2026 रोजी रात्री उशिरा एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी मृत सादियाचे वडील फारुख कासिम जमादार (वय 46, रा. जक्केकुर, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती अहमद काजी, सासरे शकील काजी आणि सासू साबिया काजी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्चमध्ये झाले होते लग्न सादिया हिचा विवाह 27 मार्च 2026 रोजी सोलापूर येथील केकडे नगर, सिद्धेश्वर कॉम्प्लेक्ससमोर, मुळेगाव रोड परिसरातील अहमद काजी याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर सादिया सासरी नांदत होती. मात्र, लग्नाच्या काही महिन्यांतच तिच्यावर सासरच्या मंडळींकडून त्रास सुरू झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. फिर्यादीनुसार, पती अहमद, सासू साबिया आणि सासरे शकील हे सादियाला घरातील कामे आणि स्वयंपाक येत नसल्याचे सांगून वारंवार टोमणे मारत होते. “तू हेंद्री आहेस, मंदबुद्धी आहेस, तुला घरातील कामे आणि स्वयंपाक जमत नाही,” अशा शब्दांत तिला हिणवले जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. व्यवसायातील नुकसानीसाठी पाच लाखांची मागणी यासोबतच पतीच्या व्यवसायात नुकसान झाल्याचे सांगून माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी सादियाकडे केली जात होती, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. पैशांची मागणी पूर्ण न केल्याने तिचा मानसिक छळ केला जात असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. सादियाला केवळ टोमणेच मारले जात नव्हते, तर शिवीगाळ आणि मारहाणही केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ती मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करत होती, असे तिच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. अखेर राहत्या घरी घेतला गळफास सासरच्या मंडळींकडून सुरू असलेल्या या कथित जाचाला कंटाळून सादियाने 17 सप्टेंबर रोजी रात्री राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सादियाच्या वडिलांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पती, सासू आणि सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सादियाच्या आत्महत्येमागे सासरच्या मंडळींकडून झालेला कथित छळ आणि पैशांची मागणी कारणीभूत होती का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. हेही वाचा… बैठकीत खाण्यापेक्षा बांधावर खा!:हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांनाच दिली काजू-बदामाची प्लेट; दत्तात्रय भरणेंचा ताफा अडवला मराठवाड्यात पावसाने दडी मारल्याने अनेक भागांत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाअभावी पिके करपल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील काही भागांत जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत पिकांची पाहणी केली. मात्र, यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांचा ताफा अडवत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. सविस्तर वाचा..
Source link
सोलापुरात सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय विवाहितेची आत्महत्या:पाच लाखांसाठी तगादा, ‘तुला घरकाम-स्वयंपाक जमत नाही’ म्हणत टोमणे