![]()
बिबट्याचा वावर आता अमरावती-वर्धा बायपासकडे सरकला आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील शिवणी परिसरात शनिवारी सकाळी शेतात गेलेल्या मजुरांना बिबट्याच्या पायाचे ठसे (पगमार्क) आढळून आले. यामुळे शहराजवळच्या या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वी हा बिबट शिरजगाव-तुळजापूर परिसरात दिसला होता. त्यावेळी तुळजापूर रोडवर वाहनचालकांनी त्याला पाहिले होते. वनविभागाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले होते आणि त्या भागात पिंजराही ठेवला होता. आज सकाळी अमरावती-वर्धा बायपासवरील शिवणी परिसरात मजुरांना बिबट्याचे ठसे दिसले. तसेच, शेतकरी अरुण गावंडे यांना नाल्याच्या वरच्या भागातून बिबट उतरताना दिसला. त्यांनी अधिक निरीक्षण केले असता, काही वेळाने तो पुन्हा वरच्या दिशेने निघून गेला. शेतकऱ्यांनी ही माहिती वनविभागाला दिली. वनविभागाने तपासणीनंतर या माहितीला दुजोरा दिला आहे. चांदूर रेल्वेच्या वन परिक्षेत्र अधिकारी शीतल घुटे यांनी सांगितले की, बिबट एकाच ठिकाणी जास्त काळ थांबत नाही. शिरजगाव-तुळजापूर परिसरात दिसलेला बिबटच आता शिवणी खदान परिसरात दिसला असावा. मोकाट कुत्र्यांना शिकार करण्यासाठी तो या परिसरात फिरत असल्याचा अंदाज आहे.
Source link
अमरावती-वर्धा बायपासजवळ बिबट्याचे ठसे आढळले:चांदूर रेल्वेच्या शिवणी परिसरात भीतीचे वातावरण, वनविभागाने माहितीला दुजोरा दिला