‘सैराट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता अरबाज शेख याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे वडील अस्लम शेख यांचे गुरुवारी (३० जुलै) दुपारी उपचारादरम्यान निधन झाले. ब्रेन हॅमरेजमुळे गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर सोलापूरमधील खासगी
.
अस्लम शेख यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चित्रपटसृष्टीसह विविध स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
वडिलांसाठी झटत होता अरबाज
वडिलांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने अरबाज शेख गेल्या काही आठवड्यांपासून त्यांच्या उपचारासाठी सातत्याने धावपळ करत होता. वडिलांना वाचवण्यासाठी मदतीचे आवाहन करत त्याने सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओही शेअर केला होता.
त्या व्हिडिओमध्ये रडत रडत “मला माझ्या वडिलांना वाचवायचं आहे,” अशी आर्त हाक त्याने दिली होती. या व्हिडिओनंतर राज्यभरातून अनेकांनी त्याला मदतीचा हात दिला होता.
रुग्णालयाच्या कारभारावर केले होते आरोप
वडिलांच्या उपचारादरम्यान अरबाज शेखने सोलापूरातील नोबेल हॉस्पिटलच्या कथित मनमानी कारभारावर गंभीर आरोप केले होते. रुग्णालयातील विशिष्ट मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती होत असल्याचा दावा त्याने सोशल मीडियावरील व्हिडिओत केला होता.
या आरोपांची दखल घेत अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने संबंधित मेडिकल दुकानांची तपासणी केली होती. तपासानंतर नियमभंग आढळल्याने संबंधितांवर कारवाईही करण्यात आली होती.
उपमुख्यमंत्र्यांनी घेतली होती दखल
अरबाज शेखने केलेल्या मदतीच्या आवाहनाची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. त्यानंतर शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या पुढाकाराने सोलापूरातील डॉ. वळसंगकर हॉस्पिटलने उपचारासाठी मदतीचा निर्णय घेतला होता.
डॉ. अश्विन वळसंगकर यांनी उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय सहकार्य देण्याची तयारी दर्शवली होती. तसेच एस. पी. न्युरोसायन्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातूनही उपचारासाठी आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यात आली होती.
आर्थिक अडचणीही मांडल्या होत्या
ब्रेन हॅमरेजनंतर सुरू असलेल्या उपचारांमुळे मोठा आर्थिक भार सहन करावा लागत असल्याचे अरबाज शेखने आपल्या व्हिडिओत सांगितले होते. उपचारांचा खर्च आणि रुग्णालयाकडून होत असल्याचा आरोप केलेल्या आर्थिक गैरप्रकारांबाबतही त्याने सार्वजनिकपणे भूमिका मांडली होती.
मात्र सर्व प्रयत्नांनंतरही अस्लम शेख यांची प्रकृती सुधारू शकली नाही आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
हे ही वाचा…
‘माझ्या बापाला मरू द्यायचं नाही…’:ओक्साबोक्शी रडत ‘सैराट’ फेम सल्याने मागितली मदत, काही तासांतच डिलीट केला भावनिक व्हिडिओ

‘सैराट’ चित्रपटामध्ये परश्याचा जिगरी मित्र ‘सल्या’ (सलीम) ही भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख सध्या खऱ्या आयुष्यात एका अत्यंत कठीण प्रसंगाला सामोरा जात आहे. अरबाजने आज पहाटे ४ वाजताच्या सुमारास आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक अत्यंत भावूक व्हिडिओ पोस्ट करत वडिलांच्या उपचारासाठी मदतीची आर्त हाक दिली. “मला माझ्या बापाला मरू द्यायचं नाहीये, प्लीज मदत करा,” असे म्हणत ओक्साबोक्सी रडणाऱ्या अरबाजच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडवून दिली. मात्र, या व्हिडिओची चौफेर चर्चा सुरू झाल्यानंतर आणि प्रशासकीय वर्तुळ हलल्यानंतर अरबाजने आता हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून डिलीट केला. सविस्तर वाचा…