Headlines

पुणे विद्यापीठातील बनावट पदवी प्रकरण:कर्मचारी अटकेत, आरोपीकडून आणखी फसवणुकीचा संशय, 4 ऑगस्टपर्यंत कोठडी




सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बनावट बी.कॉम. पदवी आणि गुणपत्रिका प्रकरणात एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला ४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. चतुःशृंगी पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून, आरोपीने यापूर्वीही अशाच प्रकारे आणखी विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे का? याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी रमेश दामोदर मुखेकर (वय ४८) याला अटक करण्यात आली आहे. मुखेकर हा विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागातील कर्मचारी असून, तो परीक्षा विभागात कार्यरत होता. त्याने एका विद्यार्थ्याच्या वडिलांना त्यांचा मुलगा बी.कॉम. उत्तीर्ण झाल्याचे भासवून बनावट पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका तयार करून दिली होती. या बदल्यात त्याने गुगल-पेद्वारे ७० हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे. पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी कोणत्या संगणकीय साधनांचा वापर केला, ती कागदपत्रे कोठे तयार केली आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास केला जाईल. तसेच, आरोपीचे मोबाईल, त्याचे आर्थिक व्यवहार आणि बँक खात्यांची माहितीही तपासली जात आहे. तपासादरम्यान आरोपी साक्षीदारांवर दबाव आणू शकतो किंवा पुराव्यांमध्ये फेरफार करू शकतो, अशी शक्यता पोलिसांनी न्यायालयासमोर मांडली. याशिवाय, आरोपीचे पूर्वीचे रेकॉर्ड, त्याने आणखी किती जणांना बनावट पदव्या किंवा गुणपत्रिका तयार करून दिल्या आहेत आणि या रॅकेटमध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही सखोल शोध घेतला जात आहे. या सर्व बाबींचा सखोल तपास करण्यासाठी न्यायालयाने आरोपीला ४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *