![]()
पुणे, प्रतिनिधी: अजिंठा लेण्यांमधील चित्रे तत्कालीन वस्त्रपरंपरेचा उत्तम नमुना आहेत. ही चित्रे त्या काळातील कलाकारांचे उच्च दर्जाचे तंत्रकौशल्य, कलात्मक दृष्टी आणि निरीक्षणशक्ती दर्शवतात, असे मत भारतीय हातमागावरील वस्त्रपरंपरा आणि मंदिर वास्तुकलेच्या अभ्यासक शेफाली वैद्य यांनी व्यक्त केले. पुण्यातील इंडी हेरीटेज आणि परिमल अँड प्रमोद चौधरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘डायलॉग’ या उपक्रमांतर्गत ‘प्राचीन भारतीय वस्त्रकला – अजिंठा विशेष’ या विषयावर शेफाली वैद्य यांचे सादरीकरण झाले. यावेळी इंडी हेरीटेजचे संस्थापक संचालक तुषार जोशी उपस्थित होते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर येथील फिरोदिया सभागृहात हे सादरीकरण झाले. श्रोत्यांसाठी प्रवेश विनामूल्य होता. भारतीय वस्त्रप्रावरणे आणि मंदिरांमधील प्रतिमानांचे तुलनात्मक अध्ययन करण्यासाठी शेफाली वैद्य यांना भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेकडून बोरी – इन्फोसिस फेलोशिप मिळाली आहे. त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण निष्कर्षांचे सादरीकरण केले. वैद्य यांनी रंगीत पारदर्शिकांच्या माध्यमातून सादरीकरण करताना, अजिंठा येथील चित्रांमधून दिसणाऱ्या वस्त्रप्रतिमा आणि त्यातून उलगडणारा सांस्कृतिक वस्त्रवारसा यावर विवेचन केले. इसवीसनपूर्व दुसरे शतक ते इसवीसनाचे सहावे शतक, अशा दीर्घ काळात अजिंठा लेण्यांमधील चित्रांचे अंकन झाले. सातवाहन ते वाकाटक राजवटींचा काळ, दक्षिणापथ आणि उत्तरापथ या व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे स्थान, राजवंश, श्रेष्ठीगण, विदेशी लोकांचे येणे-जाणे आणि राजकीय स्थैर्य यामुळे कलाप्रकारांना मिळालेला आश्रय या एकत्रित परिणामातून ही चित्रे साकारली आहेत, असे वैद्य यांनी सांगितले. या चित्रांमध्ये काळा, पांढरा, लाल, पिवळा, हिरवा आणि निळा हे प्रमुख रंग दिसतात. सर्व रंग नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण केले होते आणि त्यांचे सौंदर्य आजही टिकून आहे. लेण्यांमधील पद्मपाणि बोधिसत्त्वाच्या प्रतिमेमुळे तत्कालीन वस्त्रपरंपरेविषयीचे कुतूहल जागृत झाले, असेही त्या म्हणाल्या. अजिंठाकालीन वस्त्रप्रावरणांचे नेसलेले आणि शिवलेले असे प्रमुख प्रकार होते. उत्तरीय (शरीराच्या वरच्या भागासाठी), अधरीय (शरीराच्या खालच्या भागासाठी), कायाबंध – कटिवस्त्र किंवा कमरबंध, उपरणे, सोगा प्रकारचे वस्त्र आणि कंचुक प्रामुख्याने दिसतात. वस्त्रे अतिशय तलम, पारदर्शक आणि झुळझुळीत प्रकारची होती. त्यावरील डिझाईन्समध्ये त्या काळातील लोकप्रिय पॅटर्न्स अंकित केलेले दिसतात. चौकटी, भौमितिक आकार, फुले, पाने, वेली, पक्षी, प्राण्यांचे अंकनही वस्त्रांवर दिसते. आजही ते पॅटर्न्स आधुनिक इक्कत, पटोला, पैठणी या वस्त्रांवर दिसून येतात. वस्त्रांचे काठही विविध प्रकाराने सजवलेले दिसतात. वस्त्रे वाऱ्याने उडत आहेत, बसल्याने दुमडली आहेत, चुण्या व वळ्या पडल्या आहेत, याचेही सुस्पष्ट अंकन चित्रांमधून दिसते. राजवस्त्रे अतिशय तलम प्रकारची असून, त्यात हंसदुकूल हा पॅटर्न वारंवार दिसतो, असे निरीक्षण वैद्य यांनी नोंदवले.
Source link
अजिंठा चित्रे तत्कालीन वस्त्रपरंपरा, कलाकारांचे उच्च कौशल्य दर्शवतात:शेफाली वैद्य यांचे ‘डायलॉग’ उपक्रमात प्राचीन वस्त्रकलेवर सादरीकरण