![]()
तंत्रज्ञानाच्या वेगाने वाढीमुळे गुन्हेगारीचे स्वरूपही बदलले आहे. पारंपरिक चोरी आणि दरोड्यांऐवजी आता ऑनलाइन फसवणूक, डिजिटल आर्थिक गुन्हे आणि सायबर हल्ले वाढले आहेत. सर्वसामान्य नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी पुरेशी माहिती आणि जागरूकता नसल्याने अशा गुन्ह्यांना प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे केवळ पोलीस यंत्रणाच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाला सायबर सुरक्षेबाबत जागरूक करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक, अंमली पदार्थविरोधी विशेष कृती दल (एएनटीएफ), महाराष्ट्र राज्य, ज्योतिप्रिया सिंग यांनी केले. पुणे विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागात आयोजित राष्ट्रीय “अन्वेषण प्राविण्य कार्यशाळेच्या” (इन्व्हेस्टिगेशन मास्टरक्लास) उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. ट्रान्सेंडेंटल टेक्नॉलॉजीज आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाच्या संयुक्त विद्यमाने तसेच पुनीत बालन समूहाच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. आगामी काळात अशा कार्यशाळांचे राष्ट्रीय स्तरावर विविध शहरांमध्ये आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा (ईओडब्ल्यू), गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), श्रीकांत पाठक, पोलीस उपमहानिरीक्षक, दहशतवादविरोधी पथक (एटीएस), अरविंद साळवे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ. अरुण दातार, सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) द्वितीय समादेशक संजय शर्मा, भारत सरकारच्या गृह मंत्रालयाचे प्रतिनिधी, ट्रान्सेंडेंटल टेक्नॉलॉजीजचे प्रमुख डॉ. केतन अत्रे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. ज्योतिप्रिया सिंग म्हणाल्या की, “सायबर गुन्हे केवळ आर्थिक नुकसान करत नाहीत, तर पीडित व्यक्तीला मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागते. अनेक वेळा त्याचे गंभीर परिणाम होऊन व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त होते. सायबर गुन्ह्यांमध्ये माणसाचे संपूर्ण आयुष्य विस्कळीत करण्याची क्षमता आहे. त्यामुळे वेळेत जनजागृती आणि योग्य प्रशिक्षण हेच या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्याचे सर्वोत्तम साधन आहे.” श्रीकांत पाठक यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत गुन्हेगारांनी गुन्हे करण्याच्या पद्धती पूर्णपणे बदलल्या आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि सायबर गुन्हे केले जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी पुरेशी माहिती नसणे हे पोलीस यंत्रणेसमोरील मोठे आव्हान आहे. अरविंद साळवे यांनी दहशतवादी कारवायांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे नमूद केले. त्यामुळे सायबर सुरक्षा आणि संगणकीय अन्वेषण याबाबतचे प्रशिक्षण दहशतवादविरोधी पथकासाठीही अत्यंत महत्त्वाचे असून, त्याचा राष्ट्रीय सुरक्षेसाठी निश्चितच फायदा होईल, असे ते म्हणाले. संजय शर्मा यांनी सायबर गुन्ह्यांविषयी समाजात सातत्याने जनजागृती व्हावी यासाठी अशा कार्यशाळा देशातील विविध शहरांमध्ये आयोजित होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. नागरिक जागरूक झाले तर सायबर गुन्ह्यांचे प्रमाण निश्चितच कमी होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
Source link
सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक:विशेष पोलीस महानिरीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांचे प्रतिपादन