![]()
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने कूच केल्यानंतर आंदोलनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सणासुदीच्या काळात मुंबई-पुण्यावर ताण निर्माण होईल, असा निर्णय घेऊ नये, असे आवाहन केले. तसेच, सरकारने जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य केल्या असून उर्वरित मागणीबाबत कायदेशीर अडचण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनोज जरांगे पाटील सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असून, उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त आहे. त्याच परिस्थितीत त्यांनी मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील आंदोलनासाठी परवानगीचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी जरांगेंनी आधी उपचार घ्यावेत, असे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज्य सरकारने नेहमीच चर्चा केली. चर्चेची दारं उघडी ठेवली. 13 पैकी 12 मागण्या मान्य केल्या. 13 व्या मागणीतली कायदेशीर अडचण देखील आम्ही त्यांना सांगितली.” सरकारने कायदेशीरदृष्ट्या शक्य असलेल्या मागण्यांवर भूमिका घेतली असून उर्वरित मागणीबाबत न्यायालयीन आणि कायदेशीर अडचणी असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. ‘आंदोलन पुढेही करता येईल, पण तब्येतही चांगली असली पाहिजे’ जरांगेंच्या प्रकृतीबाबतही देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. अनेक दिवस आंदोलन सुरू असल्याने त्यांच्या तब्येतीवर विपरीत परिणाम होत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे जरांगेंनी रुग्णालयात दाखल होऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. “आंदोलन पुढेही करता येईल, पण तब्येतही चांगली असली पाहिजे हेही महत्त्वाचं आहे,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. सध्या जरांगे यांचे आंदोलन आणि मुंबईकडे सुरू असलेला प्रवास याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन न करण्याचे आवाहन मुंबई आणि पुण्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या काळात मोठ्या संख्येने नागरिक आणि भाविक शहरांमध्ये येत असतात. त्यामुळे अशा परिस्थितीत आंदोलनामुळे तणाव किंवा नागरिकांना अडचण निर्माण होईल, असा निर्णय घेऊ नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. “सरकार जर खुल्या मनानं सगळ्या गोष्टी मान्यच करते आहे, तर मग मुंबईला येऊन किंवा पुण्याला येऊन या ठिकाणी गणेशोत्सवामध्ये एक प्रकारे ताण तयार होईल अशा पद्धतीचा निर्णय त्यांनी करू नये,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, जरांगे पाटील यांनी मुंबईकडे जाण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सरकार आणि जरांगे यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुढील घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही फडणवीसांचे भाष्य दरम्यान, मराठवाड्यातील पावसातील खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरही फडणवीस यांनी भाष्य केले. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यानंतर मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी मान्य केले. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. एनडीआरएफच्या नियमांनुसार ५ ऑक्टोबरनंतर सर्वेक्षण करता येत असले तरी त्याआधी प्राथमिक सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मराठवाड्यासह ज्या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे, तेथील शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकारने घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गणेशोत्सवानिमित्त दर्शन घेताना फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना श्री गणेशाचा आशीर्वाद मिळावा, अशी प्रार्थना केल्याचेही सांगितले. अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय मेडिकल कॉलेजला १०० जागांची मंजुरी मिळाल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. हेही वाचा…. 8 सप्टेंबरला मुंबईत जाणार; मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम:रोखल्यास मराठ्यांना मुंबईत बोलावणार; सरकारला पुन्हा इशारा मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. 18 सप्टेंबरला मुंबईकडे जाणार असून मला मुंबईत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, तर मराठ्यांना मुंबईत बोलावू, असा इशारा जरांगे यांनी दिला. दरम्यान, ‘मुंबईत येऊ देणार नाही’ असे म्हणणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांनी आपले नाव जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली. सविस्तर वाचा…
Source link
सणासुदीत ताण वाढवू नका; देवेंद्र फडणवीसांचे जरांगेंना आवाहन:13 पैकी 12 मागण्या मान्य; उर्वरित मागणीवर कायदेशीर अडचण असल्याचे सरकारचे स्पष्टीकरण