Headlines

नागपुरात वादग्रस्त पुरीच्या गणपतीचा यंदा "झेन झी' अवतार:दिल्लीतील आंदोलन ते इथेनॉलच्या मुद्द्यावरून सरकारवर प्रहार




नागपूरमधील पाचपावली परिसरातील ‘चंद्रशेखर आझाद गणेशोत्सव मंडळा’ने यंदा श्रीगणेशाला ‘झेन झी’ अवतारात साकारले आहे. हे मंडळ दरवर्षी ज्वलंत राजकीय देखाव्यांसाठी ओळखले जाते. यंदा ६८ व्या वर्षात पदार्पण करताना, मंडळाने केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालय, दिल्लीतील विद्यार्थ्यांची आंदोलने आणि इंधनातील इथेनॉल मिश्रणाच्या धोरणावर भाष्य केले आहे. इंदौरा ते दिघोरी उड्डाणपुलाच्या पिलर १२ ते १३ दरम्यान, पाच कलश महादेव मंदिराजवळ हा देखावा उभारण्यात आला आहे. या मंडळाचा ६६ वर्षांहून अधिक जुना इतिहास आहे. गणेश चतुर्थीच्या मुख्य दिवशी बाप्पाची स्थापना न करता, गणेशोत्सवाच्या मधोमध किंवा नंतर मूर्तीची स्थापना करणे आणि सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर टीका करणे, ही या मंडळाची परंपरा आहे. सुरुवातीला स्व. गुलाब पुरी यांनी ही परंपरा सुरू केली. आता त्यांचे पुत्र चंद्रशेखर आणि नरेंद्र पुरी ती पुढे चालवत आहेत. दरवर्षी या देखाव्यात कोणता राजकीय किंवा सामाजिक विषय असेल, याबाबत स्थानिक पोलीस प्रशासन आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये उत्सुकता असते. यंदा या देखाव्याने थेट केंद्रीय पातळीवरील शिक्षण आणि वाहतूक धोरणाला हात घातला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यंदाच्या देखाव्यात बाप्पाच्या समोर लावण्यात आलेले फलक लक्ष वेधून घेत आहेत. दिल्लीतील दीपके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या तरुणांच्या आंदोलनाचा संदर्भ देत, एका फलकावर ‘युवाओं ने बदलाया १२ साल का खेल, जिसमें भारत के प्रमुख इंस्टाग्राम में और शिक्षामंत्री को देना पडा इस्तीफा, सरकार को झुकने को मजबूर कर दिया’ असा संदेश लिहिला आहे. दुसऱ्या एका फलकावर वाहनांमधील इथेनॉल मिश्रणाच्या सक्तीवरून धोरणकर्त्यांवर टीका केली आहे. त्यावर ‘शक्कर का जवाब नही, वहाँ मंत्री जी तुम्हारे रोड-पुलिया का खेल नही, इथेनॉल मिलाये गाडीयों का जवाब नही’ असे म्हटले आहे. या मंडळाच्या देखाव्यांचा एक ऐतिहासिक संदर्भ आहे. १९५८ मध्ये स्व. गुलाब पुरी यांनी पाचपावलीतून वादग्रस्त देखाव्यांची परंपरा सुरू केली. १९९३ मध्ये त्यांच्या निधनानंतर चंद्रशेखर आणि नरेंद्र पुरी यांनी ही परंपरा पुढे नेली. २००५ मध्ये पोलिसांनी अनेकदा मूर्ती आणि देखावे जप्त केले होते. तेव्हा पुरी बंधूंनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांना काही अटींसह प्रतिष्ठापनेची परवानगी दिली होती. २०१० आणि २०१९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर टीका करणारे फलक लावल्याने हा गणपती राज्यभर चर्चेत आला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *