![]()
सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयने 13 सप्टेंबर रोजी नव्याने एफआयआर दाखल केल्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या नव्या एफआयआरमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांसारख्या बड्या राजकीय नेत्यांच्या नावांचा उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या प्रकरणातील तपासाच्या हालचाली आता जलदगतीने सुरू झाल्या असून, संपूर्ण देशाचे लक्ष या हाय प्रोफाईल केसकडे लागले असून आता सीबीआयने या केसचा तपास आपला ‘हुकमी एक्का’ मानल्या जाणाऱ्या गोल्ड मेडलिस्ट महिला अधिकारी एसपी सीमा पाहुजा यांच्याकडे सोपवला आहे. दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड येथील एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून झाला होता. या घटनेनंतर अवघ्या सहा दिवसांनी, म्हणजेच 14 जून 2020 रोजी प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानेही आपली जीवनयात्रा संपवली होती. या दोन्ही घटनांमुळे त्यावेळी मोठी खळबळ उडाली होती. आता सीबीआयने याप्रकरणी पुन्हा एकदा लक्ष घातल्याने दिशाच्या मृत्यूचे खरे कारण आणि त्यामागील गूढ समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि राजकीय संदर्भ पाहता, सीबीआयने या केसचा तपास आपला ‘हुकमी एक्का’ मानल्या जाणाऱ्या गोल्ड मेडलिस्ट महिला अधिकारी एसपी सीमा पाहुजा यांच्याकडे सोपवला आहे. सीमा पाहुजा यांनी यापूर्वी आरजी कर रुग्णालय, हाथरस आणि उन्नाव यांसारख्या देशातील अत्यंत गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील प्रकरणांचा यशस्वी तपास करून आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे आता सीमा पाहुजा दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील नेमके कोणते गूढ उकलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कोण आहेत सीमा पाहुजा? सीमा पाहुजा या सध्या नवी दिल्ली येथील सीबीआय मुख्यालयातील स्पेशल क्राईम युनिटमध्ये पोलीस अधीक्षक (SP) या महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. अत्यंत गुंतागुंतीच्या आणि कठीण गुन्हेगारी प्रकरणांचा सखोल तपास करणे तसेच डिजिटल आणि न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) पुराव्यांचे अचूक विश्लेषण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या याच असामान्य आणि उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत, त्यांना 2021 मध्ये ‘बेस्ट इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर’ या मानाच्या सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले आहे. सीबीआयमधील आपल्या कारकिर्दीत सीमा पाहुजा यांनी देशातील अनेक खळबळजनक आणि गुंतागुंतीच्या प्रकरणांची उकल केली आहे. नुकत्याच 2024 मध्ये घडलेल्या कोलकाता येथील बहुचर्चित ‘आरजी कर रुग्णालय’ बलात्कार आणि हत्या प्रकरणासह, उत्तर प्रदेशातील देशाला हादरवून सोडणारी ‘हाथरस’ आणि ‘उन्नाव’ बलात्कार प्रकरणे, तसेच हिमाचल प्रदेशातील अत्यंत गाजलेल्या ‘गुडिया’ प्रकरणाच्या तपासात त्यांनी अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक भूमिका बजावली आहे. गंभीर कलमांसह सीबीआयचा एफआयआर दाखल मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने या प्रकरणात रीतसर एफआयआर दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये गुन्हेगारी कट रचणे, सामूहिक अत्याचार, हत्या, पुरावे नष्ट करणे आणि गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करणे अशा अत्यंत गंभीर कलमांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, सध्या तरी सीबीआयने यात कोणत्याही विशिष्ट व्यक्तीला थेट आरोपी म्हणून नामनिर्देशित केलेले नसून, तपासादरम्यान निष्पन्न होणाऱ्या पुराव्यांच्या आधारेच पुढील कारवाईची दिशा ठरवली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. असा होणार दिशा सालियन प्रकरणाचा सखोल तपास: 8 जूनच्या रात्रीचा उलगडा: 8 जून 2020 च्या रात्री नेमके काय घडले, याचा सविस्तर आणि सखोल तपास एसपी सीमा पाहुजा आणि त्यांचे पथक करणार आहे. जबाब नव्याने नोंदवणार: दिशाच्या मृत्यूच्या रात्री तिचा बॉयफ्रेंड रोहन रॉय याच्या घरी झालेल्या पार्टीला जे लोक उपस्थित होते, त्या सर्वांचे जबाब आता नव्याने नोंदवले जाणार आहेत. पुराव्यांची साखळी जुळवणार: त्या रात्री घडलेल्या घटना, साक्षीदारांचे नवे जबाब, कॉल डिटेल्स (CDR), डिजिटल डेटा आणि फॉरेन्सिक पुराव्यांची सांगड घालून पुढील तपासाची दिशा निश्चित केली जाईल. पुराव्यांतील फेरफाराची चौकशी: घटनेच्या वेळी बचाव करण्यासाठी कागदपत्रे किंवा इतर पुराव्यांमध्ये काही छेडछाड किंवा फेरफार करण्यात आली होती का, याचाही कसून तपास सीमा पाहुजा यांच्या देखरेखीखाली केला जाणार आहे.
Source link
दिशा सालियन प्रकरणाला नवे वळण:तपासाची धुरा सीबीआयच्या गोल्ड मेडलिस्ट सीमा पाहुजा यांच्याकडे, कोण आहेत पाहुजा?