Headlines

ओबीसींचा स्वतंत्र पक्ष काढू; लक्ष्मण हाकेंचा इशारा:गोपीचंद पडळकरांच्या भूमिकेवरही हल्लाबोल; जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून सरकारला घेरले




राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि मराठा आरक्षण आंदोलनावर टीका केली आहे. ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले असून सरकारकडून या समाजाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप हाके यांनी केला. वेळ पडल्यास ओबीसींचा स्वतंत्र राजकीय पक्ष काढू, असा इशाराही त्यांनी दिला. सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर आपली भूमिका मांडली. ओबीसी समाज असंघटित असल्यामुळे केवळ राजकीय फायद्यासाठी या समाजाचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मागासवर्गीय समाजातील नागरिकांच्या दाखल्यांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. ओबीसी नेते या विषयावर ठोस भूमिका घेत नसल्याची टीका हाके यांनी केली. खासदार विशाल पाटील यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दिल्याचा उल्लेख करत त्यांनी या भूमिकेवरही भाष्य केले. मराठा समाजातही कोणत्या प्रकारचे आरक्षण स्वीकारायचे, याबाबत संभ्रम असल्याचा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांवरही टीका ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री दिशाभूल करत असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. सरकारमधील मंत्री जरांगे पाटील यांची वारंवार भेट घेत असल्याने त्यांच्या आंदोलनाला बळ मिळत असल्याचे ते म्हणाले. ओबीसी आरक्षणाला सामान्य प्रवर्गासारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत बोलताना लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजातील गरीब घटकांच्या आरक्षणाच्या मागणीवर आपला आक्षेप नसल्याचे सांगितले. मात्र, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का बसू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी ओबीसी समाजाच्या हक्कांचे नुकसान होता कामा नये, असेही ते म्हणाले. गोपीचंद पडळकरांवर निशाणा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेवरही लक्ष्मण हाके यांनी प्रश्न उपस्थित केले. पडळकर हे सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने त्यांनी सरकारविरोधात आंदोलन करण्याच्या भूमिकेवर हाके यांनी टीका केली. ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आमदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरही हाके यांनी भाष्य केले. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी त्या समाजानेच आपली भूमिका ठामपणे मांडण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ‘ओबीसींचा स्वतंत्र पक्ष काढू’ ओबीसी समाज एकत्र आल्यास आगामी निवडणुकांमध्ये त्याचा राजकीय परिणाम दिसून येईल, असा दावा हाके यांनी केला. ओबीसी समाजाने संघटित होण्याची गरज असल्याचे सांगत, गरज पडल्यास स्वतंत्र ओबीसी पक्ष स्थापन करण्याचा इशारा त्यांनी दिला. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाबाबत भाष्य करत हाके यांनी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार मतदारसंघांची फेररचना करण्यासाठी डिलिमिटेशन कायदा लागू करण्याची मागणी केली. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. हेही वाचा..
जरांगेंच्या उपोषणाचा 19वा दिवस, 6 वाजता पत्रकार परिषद:महंत शिवाजी महाराजांच्या विनंतीनंतर लावले सलाईन; डॉक्टरांकडून रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची खालावलेली प्रकृती पाहता अखेर महंत शिवाजी महाराज यांच्या आग्रही विनंतीनंतर त्यांनी वैद्यकीय उपचारांना सहमती दर्शवली असून सलाईन लावून घेतले आहे. उपोषण आणि सलाईन नाकारल्यामुळे जरांगे यांच्या शरीरातील बीपी आणि शुगरची पातळी प्रचंड घटली होती. यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. वैद्यकीय पथकाने जरांगे पाटील यांची तपासणी करून तात्काळ प्राथमिक उपचार सुरू केले असले, तरी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने उपोषण मागे घेऊन रुग्णालयात दाखल व्हावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. आंदोलनाच्या पुढील दिशेबाबत मनोज जरांगे 6 वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहेत. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *