![]()
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून मुंबईतील आझाद मैदानाकडे बेमुदत उपोषणासाठी कूच केली आहे. या आंदोलनासाठी मुंबई पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली होती. सुरुवातीला गेल्या वर्षीच्या आंदोलनाचा संदर्भ देत पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र आता पोलिसांकडून या आंदोलनाची सविस्तर माहिती मागवण्यात आली असून, यामध्ये सहभागी होणाऱ्या आंदोलकांची आणि स्वयंसेवकांची नावे देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. एकीकडे पोलिसांशी पत्रव्यवहार सुरू असतानाच, दुसरीकडे या आंदोलनाला परवानगी देऊ नये यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. सार्वजनिक कल्याण आणि सुरक्षेसाठी काम करणाऱ्या ‘एमी फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने ही याचिका दाखल केली असल्याची माहिती अॅड. महेंद्र रत्ना यांनी दिली आहे. या संस्थेने 2025 मध्येही अशाच प्रकारे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला विरोध दर्शवत न्यायालयात दाद मागितली होती. गणेशोत्सवामुळे गैरसोयीची शक्यता एमी फाऊंडेशनने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, सध्या मुंबई शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अशा परिस्थितीत आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी दिल्यास, मागील वर्षीप्रमाणेच सार्वजनिक रस्ते आणि जागा बंद होऊ शकतात. यामुळे सर्वसामान्य जनतेची मोठी गैरसोय होण्याची शक्यता असून, आंदोलकांना अशा प्रकारे जनतेला वेठीस धरण्याचा कोणताही अधिकार नाही, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. सार्वजनिक जागा व्यापण्यास विरोध ‘सार्वजनिक सभा, आंदोलने आणि मिरवणुका नियम, 2025’ चा दाखला देत याचिकेत स्पष्ट करण्यात आले आहे की, नागरिकांना शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार नक्कीच आहे. परंतु त्यासाठी ते सर्वसामान्यांना अडचणीत आणू शकत नाहीत. अनिश्चित काळासाठी सार्वजनिक रस्ते किंवा जागा व्यापून ठेवणे योग्य नाही आणि अनियंत्रित संख्येने लोक एकत्र आल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही या याचिकेत नमूद करण्यात आले आहे. न्यायालयाच्या सुनावणीकडे लक्ष एमी फाऊंडेशनच्या या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार असून, युक्तिवादानंतर न्यायालय आंदोलनाला परवानगी देणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुंबईला जायचे की नाही याचा अंतिम निर्णय मनोज जरांगे पाटील हेच घेतील आणि मुंबई पोलिसांनी पाठवलेल्या पत्राला वकिलांच्या माध्यमातून योग्य ते उत्तर दिले जाईल, अशी स्पष्ट भूमिका गंगाधर काळकुटे यांनी मांडली आहे.
Source link
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला आव्हान:'एमी फाऊंडेशन'चा आंदोलनाला विरोध; उच्च न्यायालयात याचिका दाखल, उद्या सुनावणी