![]()
पुण्यात शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या आमिषाने एका व्यावसायिकाची ९५ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अक्षय दिलीप ननावरे (वय २७, रा. ससाणेनगर, हडपसर) आणि दीपक सुधाकर चौधरी (वय ३३, रा. सिद्धीविनायक अक्षर विहार सोसायटी, एनडीए रस्ता, उत्तमनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. उत्तमनगर पोलीस ठाण्यात एका व्यावसायिकाने याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर भागात राहणाऱ्या या व्यावसायिकाची आरोपींशी ओळख झाली होती. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास दरमहा पाच ते दहा टक्के परतावा देण्याचे आमिष आरोपींनी त्यांना दाखवले. या आमिषाला बळी पडून व्यावसायिकाने आरोपींना एक कोटी पाच लाख रुपये रोख दिले. तसेच, ऑनलाइन पद्धतीने १९ लाख रुपये दिले. सुरुवातीला आरोपींनी २५ लाख रुपये नफा मिळाल्याचे सांगून व्यावसायिकाला परत दिले. मात्र, त्यानंतर परतावा न मिळाल्याने व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. आरोपींनी एकूण ९५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक पंकज खोपडे या प्रकरणाचा तपास करत आहेत. ससून रुग्णालयात नोकरीच्या आमिषाने साडेतीन लाखांची फसवणूक ससून रुग्णालयात शिपाई पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणाची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी शाम अशोक खैरे, दीपाली शाम खैरे (दोघे रा. ससून क्वार्टर, सोमवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण लष्कर भागातील दस्तूर शाळेजवळ राहायला आहे. आरोपी दाम्पत्याशी त्याची गेल्या वर्षी ओळख झाली होती. दाम्पत्याने तरुणाला ससून रुग्णालयात शिपाई पदावर कायमस्वरुपी नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. तरुणाकडून वेळोवेळी साडेतीन लाख रुपये रोख आणि ऑनलाइन पद्धतीने घेतले. तरुणाने नोकरीबाबत आरोपी दाम्पत्याकडे विचारणा केली. तेव्हा दाम्पत्याने टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक एस चव्हाण तपास करत आहेत.
Source link
पुण्यात शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची फसवणूक:अक्षय ननावरे आणि दीपक चौधरी यांनी 95 लाख रुपये हडपले, गुन्हा दाखल