Headlines

त्र्यंबकेश्वरहून परतणाऱ्या कारचा इगतपुरीजवळ भीषण अपघात:कुटुंबातील चौघांचा मृत्यू, तर 6 जण गंभीर जखमी




त्र्यंबकेश्वरचे दर्शन घेऊन नाशिकहून मुंबईकडे परतणाऱ्या एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. इगतपुरीजवळील आटगाव येथे घडलेल्या या दुर्दैवी घटनेत कारमधील चार जणांचा मृत्यू झाला असून इतर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हे कुटुंब मूळचे गोरखपूरचे रहिवासी असून सध्या मुंबईतील जोगेश्वरी येथे वास्तव्यास होते. ते सर्वजण त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते आणि दर्शन आटोपून परतीच्या प्रवासात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. या भयंकर अपघातात श्रीराम जैस्वाल, आयुष जैस्वाल, लाडो जैस्वाल आणि सुरज जैस्वाल या चौघांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या धडकेत कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. सुभी, शिवम, हाशिक, सुनीता, राधिका आणि सतीश (सर्व रा. जैस्वाल) अशी या अपघातात जखमी झालेल्या सहा जणांची नावे असून, त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाडीचे ब्रेक फेल होऊन स्टेअरिंग अचानक लॉक झाल्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले असावे आणि त्यामुळेच ही धडक बसली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस या प्रकरणाचा आणि अपघाताच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *