![]()
सांगलीच्या ऐतिहासिक श्री गणपती पंचायतन संस्थानमध्ये ऐन गणेशोत्सवात उत्तराधिकारी पदावरून आणि पूजेच्या मानावरून सुरू असलेला कौटुंबिक वाद आता आणखीनच तापण्याची शक्यता आहे. आपले वडील आजारी असतात, त्यामुळे आपण गणपतीची पूजा केली, असे सांगत अभिनेत्री भाग्यश्रीने मंदिरात जाऊन आरती केली. तिच्या या कृतीनंतर संस्थानमधील हा वाद आता नव्याने उफाळून आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या प्रकरणावर संस्थानचे प्रमुख विजयसिंह राजे पटवर्धन यांनी जोरदार टीका करत आपली सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. “मी आजारी नाही, माझी तब्येत बरी आहे. कुणाला जर तसे वाटत असेल तर आजही या, किमान दोघांना लोळवण्याची ताकद आपल्यात आहे,” असे विजयसिंह राजे पटवर्धन यांनी म्हटले आहे. तसेच, भाग्यश्रीने जे कृत्य केले आहे ते चुकीचे असून तिने याबद्दल माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. विजयसिंह राजे पटवर्धन म्हणाले, मला मुलगा नसल्याने हिंदू वारसा कायदा आणि सांगली पंचायतन कायदा 1940 प्रमाणेच युवराज आदित्यराजे यांना दत्तक घेतले आहे. हा दत्तक वारसा हा कायदेशीर असून संस्थानचा एकमेव वारस हे आदित्यराजे असतील. राजा हा संस्थानचा प्रमुख असून त्यांनी सर्व विधी वेळोवेळी पार पाडायच्या असतात. आदित्यराजे यांना त्या पद्धतीने चालीरीती समजावून सांगण्यात आल्या असून त्या पद्धतीने पुढे सुरू राहतील. आदित्यराजे यांनी एक दिवस आधी गणपतीची पूजा केली असताना भाग्यश्रीने दुसऱ्या दिवशी तीच पूजा केली, ते कितपत योग्य आहे? तिला कोणी अधिकार दिला. गणपती संस्थान एकदा पूजा झाल्यानंतर ती परत करणे कितपत योग्य आहे? असा सवाल पटवर्धन यांनी केला आहे. पुढे बोलताना विजयसिंह राजे पटवर्धन म्हणाले, भाग्यश्रीने गणपती संस्थानच्या गुरुजींनाही अपमानास्पद वागवले. भाग्यश्रीने गुरुजींची माफी मागितली पाहिजे. तिने जे कृत्य केले ते चुकीचे आहे. तिच्या कृत्यात आपल्या इतर दोन मुली सामील नाहीत, असेही राजे पटवर्धन यांनी स्पष्ट केले आहे. पटवर्धन घराण्यातील वाद काय आहे? सांगली संस्थानचा हा कौटुंबिक आणि प्रशासकीय वाद नवा नसून तो अनेक वर्षांपासून सुरू आहे. 2013 ते 2016 या काळात श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांनी संस्थानच्या कारभाराची सर्व जबाबदारी आपली कन्या अभिनेत्री भाग्यश्री यांचे पती हिमालय दासानी यांच्याकडे सोपवली होती. मात्र, जावयाने संस्थानच्या जमिनी परस्पर विकल्याचा गंभीर आरोप करत विजयसिंह राजे यांनी त्यांच्याकडील सर्व अधिकार काढून घेतले. या वादानंतर भाग्यश्री आणि हिमालय दासानी यांनी सांगलीत येणेच पूर्णपणे बंद केले होते. यानंतरच्या काळात, म्हणजेच 2016 ते 2021 या दरम्यान स्वतः विजयसिंह राजे यांनी संस्थानचा कारभार सांभाळला. पुढे 2021 मध्ये त्यांनी राणीसाहेबांचे भाचे जयदीप अभ्यंकर यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली. यानंतर संस्थानच्या भवितव्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेत, विजयसिंह राजे यांनी 2023-24 मध्ये जयदीप अभ्यंकर यांचा 16 वर्षांचा मुलगा आदित्य याला दत्तक घेतले आणि त्याला संस्थानचा अधिकृत उत्तराधिकारी (युवराज आदित्यराजे पटवर्धन) म्हणून घोषित केले.
Source link
सांगली गणपती पंचायतन वाद:'दोघांना लोळवण्याची ताकद माझ्यात आहे'; विजयसिंह राजे पटवर्धनांचा लेक भाग्यश्रीवर संताप