![]()
अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य साम्यवादातील वर्गसंघर्ष आणि डॉ. आंबेडकरांच्या समानतेच्या शिकवणीवर आधारित असून, ते जागतिक मानवतावादाकडे वाटचाल करणारे आहे, असे मत मुंबई विद्यापीठाचे आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे संचालक डॉ. बळीराम गायकवाड यांनी व्यक्त केले. फ्लोरिडा विद्यापीठाचे फुलब्राईट फेलो असलेल्या डॉ. गायकवाड यांनी हे निरीक्षण नोंदवले. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे (मसाप) अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा आजच्या काळातील संदर्भ, जागतिक साहित्य आणि दलित साहित्य यांचा सहसंबंध यावर चर्चा झाली. मसापचे स्थानिक कार्यवाह आणि लेखक डॉ. आशुतोष जावडेकर यांनी डॉ. गायकवाड यांच्याशी संवाद साधला. हा कार्यक्रम मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात पार पडला. यावेळी मसापचे अध्यक्ष योगेश सोमण आणि स्थानिक कार्यवाह अंजली कुलकर्णी उपस्थित होते. डॉ. गायकवाड म्हणाले की, औपचारिक शिक्षण नसतानाही अण्णा भाऊ साठे यांनी १०२ साहित्यकृती निर्माण केल्या. त्यांना केवळ दलित साहित्यिक म्हणणे हे त्यांच्या साहित्याच्या व्यापकतेला मर्यादित करण्यासारखे आहे. त्यांच्या साहित्याचा अभ्यास केल्यास त्यांना ‘विश्वसाहित्यिक’ ही संज्ञा अधिक योग्य ठरेल. अण्णा भाऊंनी दलित, शोषित, वंचित, स्त्रिया आणि स्थलांतरित अशा अनेक घटकांविषयी लेखन केले. त्याचबरोबर त्यांनी मराठी भाषा, संस्कृती आणि महाराष्ट्रावरील आपले प्रेम उत्कटतेने व्यक्त केले. त्यांचे देशप्रेम त्यांच्या लेखनातून दिसून येते. डॉ. गायकवाड यांनी खंत व्यक्त केली की, आपण त्यांच्या मौलिक लेखनाकडे दुर्लक्ष करून त्यांचा उपमर्द केला आहे. अण्णा भाऊंचे साहित्य आपल्याला संघर्ष करायला, अन्यायाविरोधात लढायला शिकवते आणि स्वाभिमानाची जाणीव देते. ते केवळ मनोरंजनासाठी नसून, मानवी दुःखाच्या निरासाची ओढ त्यात आहे. वंचित आणि शोषितांविषयीची संवेदनशीलता देणारे असल्याने त्यांचे साहित्य कालातीत आहे आणि प्रत्येक पिढीच्या वाचकांसाठी महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानव चंद्रावर पोहोचला असला तरी, आपल्या शेजारील समाजबांधव दुःखात आहे याची जाणीव नसणे हा विरोधाभास अण्णा भाऊंनी तळमळीने मांडला आहे, असे डॉ. गायकवाड म्हणाले. तथाकथित प्रगती आणि उपेक्षित जगणे यातील दरी कमी करण्यासाठी अण्णा भाऊंच्या साहित्याचे वाचन आजही संयुक्तिक आहे. अण्णा भाऊ केवळ लेखक नव्हते, तर ते रस्त्यावरचे तळमळीचे कार्यकर्ते होते आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे प्रमुख नेते होते. त्यांनी लिहिलेले दिल्ली, बंगाल, बर्लिन आणि स्टॅलिनग्राडचे पोवाडे त्यांच्या विश्वव्यापी विचारदृष्टीचे दर्शन घडवतात. त्यामुळे अण्णा भाऊंना केवळ दलितांचे लेखक म्हणून मर्यादित करू नये, असे आवाहन डॉ. गायकवाड यांनी केले. अण्णा भाऊंची भाषाही सहज, सोपी होती. ते स्वतः सांगली – सातारा परिसरातले होते. त्यांच्या भाषेची रसाळता त्यांच्या साहित्यातून प्रकटलेली दिसते. ती ओढूनताणून सफाईदार, प्रमाणित करण्याचा कुठेही प्रयत्न त्यांनी केला नाही. त्यामुळे त्यांचे लेखन नेहेमीच थेट हृदयाला भिडणारे राहिले. जे सत्य आहे, तेच त्यांनी लिहिले, त्यांनी कल्पनेचे राज्य उभारले नाही. त्यांच्या फकीरा कादंबरीचा इंग्रजी अनुवाद मी कोरोनाकाळात पूर्ण केला. लवकरच त्यांच्या ६५ साहित्यकृतींचे अनुवाद वाचकांसमोर येतील. धर्म, वंश, वर्ण, भाषा यांच्यात भेद न करता, मानवतावादाचा स्वीकार करून जाणिवा समृद्ध करण्याची संवेदनशीलता त्यांचे साहित्य शिकवते, असेही डॉ. गायकवाड म्हणाले. मसापचा पहिला पॉडकास्ट मसापचे अध्यक्ष योगेश सोमण म्हणाले, डॉ. गायकवाड यांच्याशी होणारा संवाद हा मसापचा अधिकृत असा पहिला पॉडकास्ट आहे. लेखकांशी मनमोकळा संवाद साधण्याचा हा उपक्रम, या मुलाखतीच्या निमित्ताने सुरू होत आहे, याचा आनंद आहे.
Source link
अण्णा भाऊ साठेंचे साहित्य जागतिक मानवतावादाकडे वाटचाल करणारे:डॉ. बळीराम गायकवाड यांचे मसाप परिसंवादात प्रतिपादन