![]()
बुलढाणा जिल्ह्यातील दोन बड्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील आरोप-प्रत्यारोपामुळे जिल्ह्याची सामाजिक आणि राजकीय प्रतिमा डागाळली जात आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे या दोघांनाही जिल्ह्यातून तडीपार करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. या मागणीसाठी वंचितच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी केल्याने जिल्हा प्रशासनासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदार संजय गायकवाड आणि विजयराज शिंदे यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले आहे. मात्र, हा वाद आता राजकीय धोरणांवरून न राहता वैयक्तिक आणि अतिशय गंभीर आरोपांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे जिल्ह्यात विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. “बुलढाणा ही राजमाता जिजाऊंची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते, मात्र या नेत्यांच्या ‘वैचारिक प्रदूषणामुळे’ जिल्ह्याची बदनामी होत आहे,” अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडली आहे. ‘वंचित’चा एल्गार; प्रशासनाला साकडे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. “सामान्य गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करणारे प्रशासन, जिल्ह्याची शांतता भंग करणाऱ्या या बड्या नेत्यांवर मेहेरबानी का करत आहे?” असा सवाल यावेळी विचारण्यात आला. जिल्ह्याची बदनामी थांबवण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या दोन्ही नेत्यांना तातडीने जिल्ह्यातून बाहेर काढावे (तडीपार करावे), असे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. नेमके प्रकरण काय? आमदार संजय गायकवाड आणि भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर केलेले आरोप हे केवळ राजकीय नसून ते गुन्हेगारी स्वरूपाचे आहेत. विजयराज शिंदे यांनी अनेक मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. इतकेच नव्हे तर एका अल्पवयीन मुलीचा अवैध गर्भपातही केल्याचा खळबळजनक आरोप संजय गायकवाड यांनी केला असून, आपल्याकडे शासकीय अहवालासह सर्व पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. संजय गायकवाड यांनी केलेले आरोप विजयराज शिंदे यांनी फेटाळून लावलेत. “आमदारांनी माझाच नाही तर आदिवासी आणि मागासवर्गीय महिलांचा अवमान केला आहे,” असे म्हटले आहे. याप्रकरणी गायकवाड यांनी माफी न मागितल्यास १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशाराही शिंदे यांनी दिला आहे. हे ही वाचा… प्रवीण दरेकर होणार पुढचे ‘सहकार मंत्री’:चंद्रकांत पाटलांच्या विधानाने चर्चांना उधाण, विरोधकांच्या कर्जबाजारीपणाच्या टीकेलाही प्रत्युत्तर राज्याच्या राजकारणात अर्थ खात्यानंतर आता ‘सहकार’ खात्यावरूनही मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, “प्रवीण दरेकर यांच्या नावासमोरचा केवळ ‘कॅबिनेट दर्जा’ हा शब्द जाऊन ते लवकरच पूर्णवेळ सहकार मंत्री व्हावेत,” अशी इच्छा व्यक्त केली आहे. पाटील यांच्या या विधानामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात सहकार खात्यावर भाजपचा डोळा असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. सविस्तर वाचा…
Source link
आमदार गायकवाड अन् विजय शिंदेंना तडीपार करा:जिजाऊंच्या भूमीची बदनामी थांबवा, वंचितची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी