Headlines

नागपूर जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा:शनिवारी सर्व शाळांना सुट्टी जाहीर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश




नागपूर जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने ‘हीट वेव्ह’चा इशारा दिल्याने, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी १८ एप्रिल २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हवामान विभागाने १८ एप्रिलसाठी नागपूर जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. काही भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मार्च महिन्यापासूनच तापमानात सातत्याने वाढ होत असून, पारा ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा कडाका अधिक जाणवत असल्याने लहान मुले, वृद्ध आणि कामगार वर्गाच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेसना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उष्णतेच्या तीव्रतेपासून तात्पुरता दिलासा मिळणार आहे. पुढील काही दिवस हवामानाचा आढावा घेऊन गरज भासल्यास आणखी निर्णय घेतले जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. दरम्यान, उष्णतेच्या वाढत्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्ह्यात ‘हीट ॲक्शन प्लॅन’ लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत जिल्ह्यात एकूण ५६ शीतकक्ष (कूलिंग सेंटर्स) तयार करण्यात आले आहेत. यापैकी दोन उपजिल्हा रुग्णालये आणि ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या शीतकक्षांमध्ये एसी किंवा हाय-स्पीड कूलर्स, मुबलक बर्फ, तसेच गंभीर रुग्णांसाठी थंड पाण्याने स्पंजिंग किंवा बाथची सोय करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवला आहे. तसेच, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर शीघ्र कृती दल (रॅपिड ॲक्शन फोर्स) तैनात करण्यात आले आहे. शिक्षण विभाग आणि महिला व बालकल्याण विभागालाही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये शाळांमध्ये सकाळच्या सत्रात वर्ग घेणे, विद्यार्थ्यांना डिहायड्रेशनपासून वाचवण्यासाठी थंड पेय देणे आणि दिवसातून किमान दोन वेळा ‘वॉटर बेल’ देण्याच्या सूचनांचा समावेश आहे. नागपूरकरांनी उष्णतेपासून बचावासाठी सतर्क राहावे, भरपूर पाणी प्यावे, हलके आणि सैल कपडे वापरावेत आणि लहान मुले व वृद्धांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *