![]()
पुणे पोलिसांनी सोशल मीडियावर खंडणी वसुलीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठी कारवाई केली आहे. फरासखाना पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून, त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची राहुल सुधाकर दाभाडे आणि विवेक शैलेश पाटील अशी नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, २९ जून रोजी रात्री लक्ष्मी रस्त्यावरील विजय मारुती चौक येथे नाकाबंदी सुरू होती. यावेळी बुधवार पेठेतील एटीएम गल्लीतून पायी जाणाऱ्या तीन तरुणांना या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी अडवले. त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि कोर्ट-कचेऱ्यांच्या फेऱ्या मारायला लावण्याची धमकी देण्यात आली. कारवाईच्या भीतीपोटी तरुणांनी अखेर पोलिसांनी सांगितलेल्या एका महिलेच्या नावावर असलेल्या क्यूआर कोडवर ऑनलाईन पद्धतीने २ हजार रुपये ट्रान्सफर केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. व्हिडिओ समोर आल्यानंतर संबंधित एका तरुणाने फरासखाना पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे दोन्ही पोलिसांविरुद्ध जबरदस्तीने खंडणी वसूल केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त (डीसीपी) कृषिकेश रावले यांनी सांगितले की, सोशल मीडियावरील व्हिडिओच्या आधारे तांत्रिक तपास आणि इतर पुराव्यांवरून या दोन पोलिसांची ओळख पटवण्यात आली आहे. कर्तव्यात कसूर करून पोलिसांची प्रतिमा डागाळल्याप्रकरणी दोघांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांना पोलीस सेवेतून कायमचे बडतर्फ करण्याचा प्रस्ताव लवकरच पोलीस महासंचालक (डीजी) कार्यालयाकडे पाठवला जाईल.
Source link
ऑनलाईन खंडणी: दोन पोलीस कर्मचारी निलंबित:पुण्यात फरासखाना पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर कारवाई, बडतर्फीची प्रक्रिया सुरू