![]()
तिवसा, प्रतिनिधी: तालुक्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांमुळे झालेल्या लाखो रुपयांच्या नुकसानीविरोधात तालुका काँग्रेस कमिटीने आज तीव्र आंदोलन केले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांना इशारा निवेदन सादर करत, संबंधित कंपन्यांवर कारवाई न झाल्यास ‘जोडे मारा’ आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बोगस बियाण्याचे पोते ठेवून आपला तीव्र निषेध नोंदवला. निकृष्ट आणि कमी उगवणशक्ती असलेल्या बियाण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. काँग्रेसने प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत संबंधित बियाणे उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांना नवीन बियाणे उपलब्ध करून द्यावे किंवा तातडीने आर्थिक मदत द्यावी, जेणेकरून वेळेत दुबार पेरणी करता येईल. तसेच, कंपनी प्रतिनिधींनी तिवसा येथे येऊन शेतकऱ्यांशी आणि प्रशासनाशी संवाद साधावा, अशी मागणी करण्यात आली. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मते, बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, बियाणे अधिनियम १९६६ आणि इतर संबंधित कायद्यांनुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई व आर्थिक मदत मिळावी, अशीही मागणी करण्यात आली. तालुक्यातील शेतकरी आधीच वाढलेला उत्पादन खर्च, महागडी बियाणे, खते आणि पीक विम्याच्या अपुऱ्या मदतीमुळे आर्थिक संकटात आहेत. अशा परिस्थितीत बोगस बियाण्यांमुळे दुबार पेरणीची वेळ आल्याने त्यांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. या गंभीर परिस्थितीत शासन आणि प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. या आंदोलनात तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वैभव वानखडे, लुकेश केणे, मुकुंद पुनसे, सेतू देशमुख, शालिग्रामजी ढगे, चंदू ढगे, प्रशांत पुनसे, मंगेश पुनसे, संजय पुनसे, दिनेश ढगे, किशोर गोरडे, विश्वजीत बाखडे, सागर वाघमारे, प्रमोद वानखडे, प्रणव गौरखेडे, संजय चौधरी, अतुल गवड, वैभव ढवळे, अजिंक्य चौधरी, सचिन वानखडे, योगेश वानखडे, आदेश वानखडे, राजूभाऊ देशमुख, श्रीकांत माहोरे, आकाश मकेश्वर, गौरव चौधरी, आनंद ढगे, श्रीकांत ढगे, कैलास ठाकरे, रामदासजी पुनसे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. दुबार पेरणीचे संकट उद्भवल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार का, बोगस बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई होणार का आणि शासन नुकसानभरपाई देणार का, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Source link
बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, काँग्रेसचा प्रशासनाला इशारा:कंपन्यांवर गुन्हे दाखल न झाल्यास 'जोडे मारा' आंदोलन