Headlines

अमरावती जिल्ह्यात आज शाळा बंद:शिक्षक सामुहिक रजेवर; शाळाबाह्य कामे, टीईटीला विरोध




अमरावती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि अनुदानित शाळा आज, गुरुवारी (९ जुलै) बंद ठेवण्यात येणार आहेत. शिक्षकांनी शाळाबाह्य कामे आणि शिक्षक पात्रता परीक्षेला (टीईटी) विरोध दर्शवण्यासाठी सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने या आंदोलनाचे नेतृत्व केले असून, विविध शिक्षक संघटनांनी एकत्र येत हा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांमधील एकूण १५४९ शाळांमधील सुमारे ५ हजार शिक्षक-शिक्षिकांनी सामूहिक रजा घेऊन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षकांवर गेल्या १२ वर्षांपासून मतदार यादी पुनरीक्षण आणि सध्या सुरू असलेल्या एसआयआरसारख्या शाळाबाह्य कामांचा बोजा टाकला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्याचा शिक्षकांचा आरोप आहे. शिक्षकांना सर्व प्रकारच्या अशैक्षणिक कामांपासून मुक्त करून त्यांना विद्यार्थ्यांसोबत राहू द्यावे, अशी शिक्षक संघटनांची प्रमुख मागणी आहे. शिक्षक अभियोग्यता परीक्षेला (टीईटी) देखील शिक्षकांचा तीव्र विरोध आहे. नोकरीत येताना सर्व शिक्षकांनी सेवापूर्व परीक्षा दिली असतानाही, त्यांना टीईटीच्या नावाखाली वेठीस धरले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला देत शिक्षकांना सद्यस्थितीत तामिळनाडूच्या धर्तीवर स्वतंत्र परीक्षा घ्यावी, तसेच परीक्षेच्या कार्यप्रणालीत संरचनात्मक बदल करून ती ऑनलाइनऐवजी ऑफलाइन पद्धतीने घ्यावी, अशी शिक्षकांची मागणी आहे. १५ मार्च २०२४ च्या संच मान्यता धोरणामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाची दुरवस्था होत आहे. तीन वर्गांसाठी एक शिक्षक अशी पद्धत लागू केल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळ केला जात असून, यामुळे ग्रामीण भागातील अनेक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या सर्व मागण्यांबाबत शिक्षक संघटनांनी शासनाकडे अनेकदा अर्ज, विनंत्या आणि निवेदने दिली आहेत. मात्र, सरकारकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. अमरावतीच्या इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून सकाळी ११ वाजता एक मोर्चाही काढण्यात येणार आहे. या आंदोलनात शिक्षकांसह काही लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, युवक-विद्यार्थी संघटना आणि अन्य कर्मचारीही सहभागी होणार आहेत. यापूर्वी कृती समितीने मुंबईतील आझाद मैदानावरही सत्याग्रह केला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *