.

गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देणाऱ्या एचपीव्ही प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला सोलापूर जिल्ह्यात अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाने व्यापक जनजागृती आणि मोफत लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली असतानाही उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ १६४३ मुलींचेच लसीकरण झाले आहे. अफवा, पालकांमधील गैरसमज आणि उन्हाळी सुट्टयांमुळे मोहिमेचा वेग मंदावल्याचे आरोग्य विभागाकडून समजते. १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींना हे लसीकरण करणे आवश्यक असून शासनाने ८ मार्च महिला दिनापासून या लसीकरण मोहिमेस सुरुवात केली आहे.
जिल्हा प्रशासनाने शाळा, महाविद्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन केले होते.
एचपीव्ही लसीमुळे वंध्यत्व येते किंवा गंभीर दुष्परिणाम होतात, अशा दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसतानाही अशा अफवांचा लसीकरणावर प्रतिकूल परिणाम झाला. जिल्ह्यात सदर वयोगटातील २५ हजार ४३५ मुली लाभार्थी असताना फक्त १ हजार ६४३ मुलींचेच लसीकरण झाले असून त्यात बार्शी तालुका सर्वात आघाडीवर आहे. आता पुन्हा व्यापक जनजागृती करून पालकांचा विश्वास संपादन करण्यावर भर दिला जाणार आहे. एआय इमेज
भारत देशात महिलांमध्ये आढळणाऱ्या प्रमुख कर्करोगांमध्ये गर्भाशयमुखाचा कर्करोग महत्त्वाचा मानला जातो. एचपीव्ही विषाणूच्या संसर्गामुळे हा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे स्पष्ट दिसून येत नसल्याने अनेक रुग्णांमध्ये उशिरा निदान होते. त्यामुळे योग्य वयात प्रतिबंधात्मक एचपीव्ही लसीकरणाला महत्त्व असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पात्र वयोगटातील मुलींना एचपीव्ही लस मोफत उपलब्ध करून दिली जात आहे. जिल्हा, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच शासनाने निश्चित केलेल्या लसीकरण केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध आहे.
^ एचपीव्ही लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू आहे. पात्र मुलींच्या पालकांनी कोणताही संभ्रम न ठेवता, अफवेला बळी न पडता जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन मोफत लसीकरणाचा लाभ घ्यावा. मुलींच्या भविष्याच्या दृष्टीने ते चांगले आहे. आगामी काळात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. डॉ. सतीश कोपुरवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी