Headlines

औंध रुग्णालयाच्या 50 खाटांच्या आयसीयूची चौकशी:आरोग्य विभागाने सात दिवसात अहवाल मागवला




औंध येथील जिल्हा रुग्णालयात कोरोनाकाळात उभारण्यात आलेल्या 50 खाटांच्या अतिदक्षता विभागाच्या (आयसीयू) वापराबाबत आरोग्य विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत. या आयसीयूतील अनेक खाटा सध्या बंद असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा अहवाल सात दिवसांत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोना महामारीच्या काळात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्हा रुग्णालयात अतिरिक्त 50 खाटांचा आयसीयू तयार करण्यात आला होता. यासाठी व्हेंटिलेटर, मॉनिटर, ऑक्सिजन व्यवस्था आणि इतर वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यात आली होती. कोरोनानंतरही ही सुविधा रुग्णांसाठी पूर्ण क्षमतेने सुरू राहणे अपेक्षित होते, मात्र सध्या काहीच खाटा वापरात असल्याचे निदर्शनास आले आहे. आरोग्य विभाग आता या आयसीयूसाठी खरेदी केलेली उपकरणे कुठे आहेत, ती कार्यरत स्थितीत आहेत का आणि त्यांचा रुग्णांच्या उपचारासाठी वापर होतो का, याची तपासणी करणार आहे. तसेच, आयसीयू उभारण्यासाठी किती निधी खर्च झाला, कोणती उपकरणे खरेदी करण्यात आली आणि त्यांचा वापर कसा झाला, याची कागदपत्रांसह पडताळणी केली जाईल. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. समितीला सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चौकशीत हलगर्जीपणा किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधित दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद आहे. याव्यतिरिक्त, 50 खाटांचा हा आयसीयू पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याच्या सूचनाही आरोग्य विभागाने दिल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *