Headlines

खासगी कंपनीच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप ग्रूप; 40लाख रुपयांची सायबर फसवणूक:कर्मचाऱ्याच्या फिर्यादीनंतर पुण्याच्या अलंकार पोलिसांकडून तपास सुरू




पुण्यात एका खासगी कंपनीच्या नावाने समाज माध्यमांवर बनावट समूह (ग्रुप) तयार करून सायबर चोरट्यांनी 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कंपनीतील एका कर्मचाऱ्याने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कर्मचारी एरंडवणे येथील एका खासगी कंपनीत कार्यरत आहेत. सायबर चोरट्यांनी ‘वर्क ग्रुप चॅट’ या नावाने कंपनीच्या कामकाजाविषयी एक बनावट समूह तयार केला. या समूहात कंपनीतील संचालक महिला आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला. या बनावट समूहाद्वारे चोरट्याने कंपनीच्या बँक खात्यातील जमा रकमेची माहिती मिळवली. त्यानंतर, त्याने कर्मचाऱ्याला 40 लाख रुपयांचा धनादेश त्याच्या खात्यात जमा करण्यास सांगितले. कंपनीच्या कामकाजासाठी ही रक्कम जमा करण्यास सांगितल्याने कर्मचाऱ्याचा विश्वास बसला आणि त्याने धनादेश जमा केला. धनादेश वटल्यानंतर 40 लाख रुपये चोरट्याच्या खात्यात जमा झाले. कंपनीतील संचालकांनी कर्मचाऱ्याकडे या रकमेबाबत विचारणा केली असता, हा फसवणुकीचा प्रकार समोर आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक उल्हास कदम या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. भावाला नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक दरम्यान, भावाला नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेच्या क्रेडिट कार्डमधून चार लाख 13 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची दुसरी घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सायोना सुदेश खाजेकर (वय 33, रा. काकडे वस्ती, कोंढवा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 16 ते 17 डिसेंबर 2024 या कालावधीत आरोपींनी फिर्यादींच्या भावाला नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी विविध शुल्क भरण्याची आवश्यकता असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. आरोपींनी फिर्यादींच्या क्रेडिट कार्डमधून चार लाख 13 हजार रुपये विविध खात्यांत ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. नोकरी न मिळाल्याने आणि पैसे परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे खाजेकर यांच्या लक्षात आले.या प्रकरणी एनईओ कन्सल्टन्सी चालवणारी मधू तिरुमला, तसेच ‘आरएझेड एमओएस युटिलिटी लिमिटेड’ आणि ‘नायडू सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी’ या नावांवरील बँक खात्यांचे धारक व वापरकर्त्यांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *