Headlines

दावा 1.21लाख टन बफर स्टाॅकचा, रवाना अवघा 12हजार 400टन कांदा:दर नियंत्रण याेजनेचा फज्जा, भाव 70 रुपये किलाेच




देशभरात कांद्याचे भाव नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून ‘कांदा एक्स्प्रेस’चा गाजावाजा केला. मात्र, इन्व्हेस्टिगेशनमध्ये या संपूर्ण यंत्रणेचे पितळ उघडे पडले आहे. यंदा तब्बल १ लाख २१ हजार टन कांद्याचा बफर स्टॉक असल्याचा दावा दोन्ही नोडल एजन्सींनी केला. मात्र, प्रत्यक्षात केवळ १२ हजार ४०० टन कांदाच रवाना झाला आहे. त्यामुळे उर्वरित १ लाख ८ हजार ६०० टन कांदा नेमका गेला कुठे? तो गोदामांमध्ये सडतोय की त्याची परस्पर विल्हेवाट लावली गेली, असा गंभीर प्रश्न यातून निर्माण झाला आहे. दिल्ली, पंजाब, कोलकाता, चेन्नई, पाटणा आणि गुवाहाटी या प्रमुख बाजारपेठांमध्ये कांदा पाठवून दरावर नियंत्रण मिळवल्याचा आव शासनाकडून आणला जात आहे. ६००० रुपयांवरून घाऊक भाव ३,५०० रुपये प्रतिक्विंटलवर आल्याचा दावा मंत्रालयाकडून केला जात आहे; परंतु प्रत्यक्षात किरकोळ बाजारात सर्वसामान्यांना ३५ रुपये किलोचा सवलतीचा कांदा मिळतच नाहीये. उलट नाफेडच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांच्या हाती कवडीमोल दर आणि ग्राहकांच्या खिशाला मात्र ७० रुपये किलो दरामुळे कात्री लागत आहे. दिशाभूल करणाऱ्या आकडेवारीमुळे बाजारभाव कमी नाफेड आणि एनसीसीएफच्या या ‘रिटेल इंटरव्हेन्शन’चा थेट फटका नाशिकच्या स्थानिक बाजारपेठांना बसत आहे. सरकारी संस्थांच्या या दिशाभूल करणाऱ्या आकडेवारीने बाजारातील भाव कमी केले आहेत. ‘प्राइस स्टॅबिलायझेशन फंड’च्या नावाखाली शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल दराने खरेदी करून बाजारात पाठवण्याचे नियोजन न करता केवळ कागदी आकडेवारी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घ्यायची, असा हा प्रकार आहे. परिणाम : फक्त १२ रेक कांदा परराज्यात रवाना एका रेल्वे रेकमधून तब्बल ८०० टन कांदा पाठवला जातो. नाफेड आणि एनसीसीएफकडून सुरुवातीला लासलगाव रेल्वे स्थानकातून दोन रेक, तर उर्वरित दहा रेक मनमाड येथून (१५, १८, २१, २९ सप्टेंबर आणि २, ५, ८, १३, १४ ऑक्टोबर रोजी) पाठवण्यात आले. या १२ रेकद्वारे केवळ ९ हजार ६०० मेट्रिक टन कांदाच परराज्यात रवाना झाला आहे. कारण : अयोग्य खरेदीमुळे सर्व बफर स्टॉकच खराब केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या निर्देशांनुसार ४४० टन कांदा घेऊन रेल्वे आगरतळाकडे रवाना झाली. मात्र, १ लाख २१ हजार टनांच्या बफर स्टॉकच्या दाव्याच्या तुलनेत ईशान्य भारतात आतापर्यंत दोन रेक आणि ४४ ट्रक्सद्वारे अवघा २ हजार ८०० टन कांदा पाठवण्यात आला आहे. उर्वरित १,०८,६०० टन कांदा गोदामांमध्ये सडल्याचे स्पष्ट होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *