![]()
नवरात्रोत्सवात महिलांनी आपल्या विकारांचा त्याग करून गाथा, ज्ञानेश्वरी, गीता ग्रंथाचे पारायण करावे, असा उपदेश वैजापूर तालुक्यातील गोळवाडी येथे हभप बाळू महाराज गिरगावकर यांनी केले आहे. बाळू गिरगावकर महाराज यांनी ज्याचे आयुष्य लेखा, तेही देखा निमाले! इतरांचा पाडा कोण नेमीले जाण न चुके ती ! या संत एकनाथ महाराज यांच्या अभंगावर कीर्तन सेवा केली. ते पुढे म्हणाले की, ज्याचं आयुष्य आतापर्यंत विधात्याला लिहिता आलं नाही. त्याला सुद्धा जावं लागलं. त्यापुढे तुमचे आमचे आयुष्य किती आहे? सर्वांनी सत्ता संपत्ती येथे सोडून जावे लागणार आहे. कारण देह हा पंचमहाभूतांकडून उसना घेतला आहे. तो आपल्याला कधी ना कधी सोडावाच लागणार आहे. मोठ्या श्रद्धेने व भावयुक्त अंतःकरणाने केल्या जाते ती श्राद्ध होय. नीती शास्र सांगते दोन लोकांच्या विरोधात कधी जायचं नाही. सज्जन आणि मूर्ख माणसाच्या विरोधात कधी जायचं नाही. सज्जन जे बोलतो ते आपल्याला फायद्याचे बोलतो व मूर्ख माणसाच्या विरोधात कधीच जायचं नाही कारण ते आपल्याला कधीच परवडत नाही, असेही यावेळी महाराज म्हणाले. नवरात्रीत नऊ दिवस उपवास केल्यापेक्षा महिलांनी घरातील सासू, सासरे यांची आपले आई बाप समजून सेवा करावी. नवऱ्याची मनोभावे सेवा करावी, असाही उपदेश त्यांनी केला. तसेच नवरात्रीत महिलांनी गाथा, ज्ञानेश्वरी, गीता यांचे महिलांनी घरोघरी पारायण करावे. भजन करावे, असेही महाराज म्हणाले. यावेळी स्वामी विमल गिरी महाराज, स्वामी भोले बाबा महाराज, पांडुरंग महाराज पवार, हरिनाथ महाराज ढगारे, रामेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराज, संतोष शिंदे, ब्रह्म महाराज येवले, आमदार रमेश बोरनारे, कृषिभूषण अप्पासाहेब रामकृष्ण पाटील, मनाजी पाटील मिसाळ, जि.प. सदस्य संजय निकम, जि.प. सदस्य सुभाष तांबे, पं. स. सदस्य राहुल शेळके यांच्यासह वारकरी, भजनी मंडळी व गोळवाडी, बोरदहेगाव, रहेगाव्हाण, पालखेड, करंजगाव येथील महिला व पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी कीर्तनात बाळनाथ पगार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रघुनाथ पगार, नवनाथ पगार, कारभारी पगार, गणेश पगार यांच्यातर्फे ५०० केशर आंबा रोपाचे उपस्थितांना वाटप करण्यात आले.
Source link
विकारांचा त्याग करून गाथा, ज्ञानेश्वरी, गीता ग्रंथाचे पारायण करा, बाळू गिरगावकर महाराजांचे आवाहन, वैजापूर तालुक्यातील गोळवाडी येथे कीर्तनाची सांगता