![]()
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शालेय साहित्यात होत असलेल्या विलंबावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “शाळा 15 जूनला सुरू झाल्या, आणि आता ऑगस्ट महिना आला आहे. विद्यार्थी जुने गणवेश किंवा घरच्या कपड्यांवर शाळेत येत आहेत. भाजपच्या निर्णयामुळेच विद्यार्थ्यांना दोन महिने साहित्य मिळालेले नाही. तुम्ही पास झाल्यावर विद्यार्थ्यांना पुस्तके देणार का?” असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बीएमसी शाळांची दुर्दशा, झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन, गडचिरोलीतील आश्रमशाळेतील मृत्यू आणि मुंबईतील मोकळ्या जागांच्या मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले. भाजपने शिक्षण व्यवस्थेत मोठा घोळ घातलाय बीएमसी शाळांच्या सद्यस्थितीवर बोट ठेवत आदित्य ठाकरे म्हणाले, “आमच्या काळात आम्ही टॅब, डिजिटल क्लासरूम, व्हर्चुअल क्लासरूम आणि एसएससीसोबतच आयबी (IB), सीबीएससी (CBSE), आयजीसीएससी (IGCSE) बोर्ड आणून पालिकेच्या शिक्षणाचा दर्जा उंचावला होता. विद्यार्थ्यांना 27 वस्तू मोफत दिल्या जायच्या. पण फेब्रुवारी-मार्चमध्ये भाजपच्या मुंबई अध्यक्षांनी सर्व प्रक्रिया बदलून टाकली आणि त्यात मोठा घोळ झाला. शाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी अजून विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या-पुस्तके, छत्र्या आणि स्टेशनरी मिळालेली नाही. यात पालिका प्रशासनाची किंवा शिक्षकांची कोणतीही चूक नसून, पूर्णपणे भाजपच्या चुकीच्या निर्णयामुळे विद्यार्थी वंचित राहिले आहेत. भाजपने यासाठी मुंबईकरांची माफी मागितली पाहिजे.” मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यादेखत मुंबईचे प्रायव्हेटायझेशन मुंबईतील मोकळ्या जागा आणि शाळांच्या खासगीकरणावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबईतील शाळांचे प्लॉट्स आणि त्यांचे आरक्षण बदलून ते खासगी बिल्डरांच्या घशात घालण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर मुंबईतील 16 एकर मोकळी जागा एका भाजप आमदाराला फुटबॉल मैदानासाठी फुकटात दिली गेली. वांद्रे असो वा इतर ठिकाणचे ओपन स्पेस, हे सरकार सगळं काही बिल्डरांना विकायला निघाले आहे. मी माझ्या नगरसेवकांना प्रत्येक शाळेत जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्यास सांगितले आहे.” झारखंड आंदोलनात दगडफेक करणारे भाजपचे गुंड झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनावर आणि जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर बोलताना त्यांनी भाजपचा दुटप्पीपणा उघड केला. “कोणत्याही शांततापूर्ण आंदोलनावर लाठीचार्ज होणे चुकीचेच आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो. पण सोशल मीडियावर जे व्हिडिओ समोर आलेत, त्यात पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांच्या हातात भाजपचे झेंडे दिसत आहेत. हे लोक कोण होते? त्यांना दुसऱ्या राज्यांतून गाड्या करून आणले गेले होते. सीआयडी (CID) चौकशी सुरू आहे आणि तिथल्या मंत्र्यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे.” पंतप्रधान आणि गृहमंत्री संसदेत का येत नाहीत? “जंतर-मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार झाले. पण देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत जाऊन यावर उत्तर द्यायला तयार नाहीत. ईडी (ED), सीबीआय (CBI) सारख्या यंत्रणा हातात असूनही सत्ताधारी घाबरून संसदेत जात नसतील, तर हे जगातील पहिलेच उदाहरण असेल. गृहमंत्री ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत का?” असा उपरोधिक सवाल त्यांनी केला. आशिष शेलारांना उपचारांची गरज भाजप नेते आशिष शेलार यांनी ‘राहुल गांधींनी झारखंडला जावे’ असे केलेल्या विधानावर उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, “ज्यांना त्यांच्या पक्षात कोणी विचारत नाही, ज्यांच्या खात्यात काम करायला काहीच उरलेले नाही, ते नेहमी मुख्यमंत्र्यांवर किंवा त्यांच्या जवळच्या लोकांवर टीका करतात. मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. त्यांना ‘थेरपी’ची (उपचाराची) गरज आहे, मी त्यांच्यावर जास्त बोलणार नाही.” गडचिरोलीतील आश्रमशाळेतील मृत्यू संतापजनक गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर ते म्हणाले, “आश्रमशाळांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळते, तरीही तिथे 80 विद्यार्थिनींना साधे बेड नाहीत, ही अतिशय भयानक आणि संतापजनक परिस्थिती आहे. शासकीय यंत्रणा नेमके काय काम करत आहे?” जेलमधील लोक आता भाजपमध्ये सोनिया गांधींच्या विधानावरून टीका करणाऱ्या भाजपला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, “ज्यांच्यावर भाजप भ्रष्टाचाराचे आरोप करत होता आणि जे लोक जेलमध्ये होते, तेच सगळे लोक आता भाजपच्या वॉशिंग मशीनमधून जाऊन भाजपसोबत सत्तेत बसले आहेत.”
Source link
पास झाल्यावर विद्यार्थ्यांना पुस्तके देणार का?:मुंबई महापालिकेच्या शालेय साहित्य वाटपातील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा संताप