![]()
हिंगोली शहरासह जिल्हाभरात बसविल्या जाणाऱ्या स्मार्ट मिटरच्या विरोधात हिंगोलीकर एकवटले असून मंगळवारी ता. 11 हिंगोली येथे विज कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी अधिकाऱ्यांना पुष्पहार घालून गांधीगिरी केली. जिल्ह्यात स्मार्ट मिटर बसविल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. हिंगोली शहरात विज कंपनीकडून स्मार्ट मिटर बसविले जात आहेत. ग्राहकांची मागणी नसतांनाही जूने मिटर बदलून स्मार्ट मिटर दिले जात आहेत. त्यामुळे ग्राहक व यंत्रणेवर अनावश्यक आर्थिक भार टाकला जाणार आहे. स्मार्ट मिटरची सक्ती रद्द करावी, सोलार ग्राहकांवरील ग्रिड सपोर्ट चार्जेस रद्द करावेत, मिटर रिडींगमधील तफावती दूर कराव्यात यासह इतर मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौकातून काढण्यात आलेल्या मोर्चात आमदार संतोष बांगर, नंदकिशोर तोष्णीवाल, उपनगराध्यक्ष माबूद बागवान, पालिकेचे गटनेते श्रीराम बांगर, नगरसेवक दिलीप चव्हाण, नाना नायक, राम कदम, अनिल नेनवाणी, पंकज अग्रवाल, शेख नईम शेख लाल, जगजीत खुराणा, सुमीत चौधरी, रवी नेनवाणी, शेख खलील बेलदार, कैलास शहाणे, केशव दुबे, शेख जुबेर, नितीन राठौर यांच्यासह नागरीक सहभागी झाले होते. हिंगोली शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या मोर्चा विज कंपनीच्या कार्यालयावर आल्यानंतर त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी मोर्चेकऱ्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजीकरीत अधिकाऱ्यांच्या कक्षात प्रवेश केला. स्मार्ट मिटर बसविण्याची सक्ती केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देण्यात आला. तसेच ज्या ठिकाणी स्मार्ट मिटर बसविण्यात आले त्या ठिकाणचे मिटर काढून जूने मिटर बसविण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर अधिकाऱ्यांना पुष्पहार घालून गांधीगिरी केली. यावेळी त्यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या मागण्यांबाबत वरिष्ठांकडे कळविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
Source link
स्मार्ट मिटरच्या विरोधात हिंगोलीकर एकवटले:विज कंपनीच्या हिंगोली कार्यालयावर मोर्चा, अधिकाऱ्यांना पुष्पहार देऊन गांधीगिरी