![]()
महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी (GCC) भारतातील आघाडीचे आणि सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार आहे. राज्यात ४०० नवीन जागतिक क्षमता केंद्रे, ४ लाख उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या संधी आणि ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हॉटेल कॉनराड येथे आयोजित जीसीसीप्रोज नेतृत्व शिखर परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक व धोरण सल्लागार कौस्तुभ धवसे, जीसीसीप्रोजचे मुख्य सल्लागार निलेश देशमुख, शम्मी प्रभाकर, वरिष्ठ अधिकारी तसेच विविध जागतिक क्षमता केंद्रांचे प्रमुख आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारतातील जागतिक क्षमता केंद्रांच्या वाटचालीची सुरुवात कुशल मनुष्यबळ, कौशल्य आणि खर्चाच्या दृष्टीने कार्यक्षमतेच्या आधारे झाली. मात्र, आता या क्षेत्राचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलत आहे. सन २०३० मधील जागतिक क्षमता केंद्रे केवळ कार्यालयीन सहाय्यक कामकाजापुरती मर्यादित राहणार नाहीत. ही केंद्रे अभियांत्रिकी, कृत्रिम बुद्धिमत्ता, उत्पादन विकास, सायबर सुरक्षा, वित्तीय सेवा, माहिती विश्लेषण तसेच संशोधन व विकासाची केंद्रे बनतील. या केंद्रांमधून जागतिक व्यवसायांचे महत्त्वपूर्ण निर्णयही घेतले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राकडे जागतिक क्षमता केंद्रांसाठी आवश्यक असलेली सर्वसमावेशक परिसंस्था आधीपासूनच उपलब्ध आहे. मुंबईकडे देशातील सखोल वित्तीय व व्यावसायिक परिसंस्था आहे, तर पुण्याकडे अभियांत्रिकी, वाहन उद्योग, उत्पादन क्षेत्र, तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाचा मजबूत आधार आहे. नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांमध्येही जागतिक क्षमतेची विशेषीकृत केंद्रे विकसित करण्याची क्षमता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात केवळ एका शहरात गुंतवणूक करण्याची संधी नसून, विविध शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या प्रतिभा, कौशल्य आणि औद्योगिक क्षमतांचा एकत्रित लाभ घेण्याची संधी आहे. महाराष्ट्रात केवळ एक चांगले शहर नाही, तर शहरांचे, प्रतिभेचे आणि क्षमतांचे संपूर्ण जाळे उपलब्ध आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. पुण्याने सन २०२५ मध्ये जागतिक क्षमता केंद्रांच्या क्षेत्रातील आपली योग्यता सिद्ध केली आहे. सन २०२५ मध्ये पुणे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे जागतिक क्षमता केंद्राची कार्यालयीन बाजारपेठ बनले असून, मागील वर्षाच्या तुलनेत या केंद्रांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. सन २०२६ च्या अखेरीस जागतिक क्षमता केंद्रांच्या क्षेत्रात पुणे देशाचे नेतृत्व करेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
Source link
राज्यात 400 नवीन जागतिक क्षमता केंद्रे, 4 लाख रोजगार:महाराष्ट्राला सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनवण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार