![]()
पुणे महानगरपालिकेच्या महापौर निवासाचे नाव बदलून ‘रामदूत’ करण्याच्या प्रस्तावावरून शहराच्या राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. स्वीकृत नगरसेवक रवींद्र साळेगावकर यांनी हा प्रस्ताव दिला असून, याला माजी महापौर संघटना आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. घोले रोड येथील या महापौर निवासाचे नाव न बदलता ते पूर्वीप्रमाणेच कायम ठेवावे, अशी मागणी पुणे शहर पूर्व महापौर संघटनेने महापालिका प्रशासनाकडे केली आहे. संघटनेने पुण्याच्या ऐतिहासिक ओळखीचा दाखला देत या नामकरणास विरोध केला आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात महापौरांना निवासाची सुविधा मिळावी, या उद्देशाने महापालिकेने घोले रोड येथे दोन मजली बंगला उभारला होता. २००२ मध्ये तत्कालीन महापौर दीप्ती चवधरी यांच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन झाले होते. तेव्हापासून ही वास्तू ‘महापौर निवास’ याच नावाने ओळखली जाते. पूर्व महापौर संघटनेच्या अध्यक्षा राजलक्ष्मी भोसले, सचिव कमल व्यवहारे आणि संयोजक अंकुश काकडे यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे. त्यांनी महापौरांकडे संबंधित नगरसेवकाला हा प्रस्ताव मागे घेण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट)नेही या नामकरण प्रस्तावाला विरोध केला आहे. पुणे शहर प्रचारप्रमुख अनंत घरत यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सार्वजनिक आणि संवैधानिक वास्तूला धार्मिक स्वरूप देणे योग्य नसल्याचे घरत यांनी म्हटले आहे. महापौर निवास ही कोणत्याही व्यक्ती, पक्ष अथवा धर्माची मालमत्ता नसून, पुणेकरांच्या करातून उभारलेली सार्वजनिक वास्तू आहे. त्यामुळे तिची धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक ओळख कायम ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Source link
महापौर निवासाचे 'रामदूत' नामकरण वादात:माजी महापौर संघटना, ठाकरे गटाचा तीव्र विरोध; प्रस्ताव मागे घेण्याची मागणी