Headlines

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परताव्याला वेग:10 ऑगस्टला मिळालेल्या 300 कोटींपैकी 45 कोटी एका दिवसात वितरित




अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परताव्याच्या वितरणाला गती मिळाली आहे. १० ऑगस्ट रोजी महामंडळाला प्राप्त झालेल्या ३०० कोटी रुपयांपैकी ४५ कोटी रुपयांचा व्याज परतावा अवघ्या एका दिवसात पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र शासनाने महामंडळाच्या विविध योजनांसाठी ७५० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. यापैकी आतापर्यंत ४५० कोटी रुपये महामंडळाला प्राप्त झाले आहेत. जून महिन्यात मिळालेल्या १५० कोटी रुपयांच्या निधीचे वितरण पूर्ण झाले आहे. १० ऑगस्ट रोजी महामंडळाला आणखी ३०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. या निधीतून पात्र लाभार्थ्यांच्या व्याज परताव्याचे वितरण वेगाने सुरू आहे. निधी मिळाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या प्रकरणांची आवश्यक तपासणी व कार्यवाही पूर्ण करून व्याज परताव्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. महामंडळाच्या विविध योजनांमधून बँकांकडून कर्ज घेऊन स्वयंरोजगार, व्यवसाय किंवा उद्योग सुरू करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना कर्जावरील व्याजाचा परतावा दिला जातो. यामुळे नवउद्योजकांना कर्जाच्या आर्थिक भारातून दिलासा मिळतो आणि व्यवसायाच्या विस्ताराला मदत होते. राज्य शासनाने यावर्षी महामंडळासाठी केलेल्या ७५० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमुळे पात्र लाभार्थ्यांना व्याज परताव्याचा लाभ देण्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद उपलब्ध झाली आहे. महामंडळाला प्राप्त होणाऱ्या निधीनुसार पात्र प्रकरणांचे वितरण प्राधान्याने करण्यात येत आहे. प्रलंबित व्याज परतावा प्रकरणे शक्य तितक्या लवकर निकाली काढण्यासाठी महामंडळामार्फत विशेष प्रयत्न सुरू आहेत. पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा व्याज परतावा वेळेत मिळावा, यासाठी प्रकरणांची छाननी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि निधी वितरणाची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी सांगितले की, “महामंडळाला प्राप्त झालेल्या निधीतून पात्र लाभार्थ्यांच्या व्याज परताव्याचे वितरण प्राधान्याने केले जात आहे. जून महिन्यात प्राप्त झालेल्या १५० कोटी रुपयांच्या निधीचे वितरण पूर्ण झाले असून, १० ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या ३०० कोटी रुपयांच्या निधीतूनही वितरणाला गती देण्यात आली आहे. यापैकी ४५ कोटी रुपयांचा व्याज परतावा एका दिवसात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. उर्वरित पात्र प्रकरणांमध्येही नियमानुसार कार्यवाही करून व्याज परतावा वितरित करण्यात येत आहे.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *