![]()
गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्याला अपमानास्पद वागणूक देत अरेरावी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात मंगळवारी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार आंदोलन छेडले. शेतकऱ्यांच्या तीव्र आक्रोशानंतर बाजार समिती प्रशासनाने संबंधित व्यापाऱ्यांचा परवाना १५ दिवसांसाठी निलंबित केला आहे. बगडी येथील शेतकरी दत्तू सूर्यभान बोडखे यांनी सोमवारी त्यांचा कांदा विक्रीसाठी आणला होता. लिलावात मिलन ट्रेडिंगच्या व्यापाऱ्याने २४०० रुपये बोली लावून व्यवहार ठरवला; मात्र नंतर कांदा खराब असल्याचे सांगत माल स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर दुसऱ्या व्यापाऱ्याने २३०० रुपयांची बोली लावल्यावर, बोडखे यांनी आधीच्या व्यापाऱ्याकडे नाराजी व्यक्त केली. यावर संतापलेल्या मिलन ट्रेडिंगच्या व्यापाऱ्याने अपमानास्पद भाषा वापरत शेतकऱ्याचा अपमान केल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती पसरताच सकाळी शेकडो शेतकऱ्यांनी बाजार समिती कार्यालयासमोर एकत्र येत ठिय्या आंदोलन सुरू केले. सुमारे दोन तास चाललेल्या या आंदोलनात व्यापाऱ्यांचा परवाना रद्द करण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बाजार समितीच्या सभापती अर्चना कृष्णा सुकासे व संचालकांनी घटनास्थळी धाव घेतली. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाने ‘मिलन ट्रेडिंग’ व ‘मिल्लत ट्रेडिंग’चा परवाना १५ दिवसांसाठी रद्द केला, तसेच चौकशीअंती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनात राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे, अविनाश पाटील, वाल्मीक सिरसाठ, सुभाष कानडे, कांता टेमकर, गजानन गायकवाड यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
Source link
गंगापूर बाजार समितीत व्यापाऱ्याच्या अरेरावीविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन:शेतकऱ्याच्या आक्रमक पवित्र्यानंतर व्यापाऱ्याचा परवाना 15 दिवसांसाठी रद्द