Headlines

यंदाच्या श्रावणात खुलताबादेत भद्रा मारुतीचे दर्शन तासाभरातच होणार:शुक्रवार अन् शनिवारी 10 लाखांपेक्षा जास्त भाविक येण्याची शक्यता




श्रावण महिन्यात घृष्णेश्वराच्या दर्शनासोबतच भद्रा मारुती मंदिरामध्ये भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. यंदा 10 लाख भाविक येण्याची अपेक्षा आहे. विशेषतः शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवशी भाविकांची मोठी गर्दी असणार आहे. त्यासाठी भद्रा मारुती विश्वस्त मंडळाने विशेष नियोजन केले आहे. भाविकांना अवघ्या तासाभरातच दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच पावसापासून बचावासाठी तीन पत्र्यांचे शेड उभारण्याचे काम सुरू आहे. श्रावण महिन्यात खुलताबाद–वेरूळ या ठिकाणी कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि महाराष्ट्रभरातून भाविक येतात. भाविकांना ऊन-पावसापासून संरक्षण मिळावे, यासाठी विश्वस्त मंडळातर्फे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. वेरूळ, खुलताबाद मार्गावरील जड वाहतुकीत बदल असे असतील नवीन पर्यायी मार्ग : कन्नडकडे जाणारी वाहने : कन्नड, वेरूळ, खुलताबाद तसेच फुलंब्रीकडून येणारी-जाणारी जड वाहने आता छत्रपती संभाजीनगर, शरणापूर फाटा, माळीवाडा, कसाबखेडा फाटामार्गे कन्नडकडे वळवण्यात आली आहेत. फुलंब्रीकडे जाणारी वाहने : वैजापूर, शिऊर, पाचपीरवाडीकडून वेरूळमार्गे फुलंब्रीकडे जाणारी वाहने आता शरणापूर फाटा, छत्रपती संभाजीनगरमार्गे फुलंब्रीकडे जातील. भाविकांच्या सुरक्षेसाठी जड वाहनधारकांनी प्रशासनाने निर्धारित केलेल्या पर्यायी मार्गांचाच अवलंब करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी केले आहे. 70 सुरक्षा रक्षक, 100 स्वयंसेवकांची नियोजनासाठी घेणार मदत गर्दीच्या काळात भाविकांच्या सुरक्षेसाठी 70 सुरक्षा रक्षक तैनात असतील. तसेच अनिरुद्ध अकॅडमी मॅनेजमेंटचे 100 स्वयंसेवक मदतीसाठी कार्यरत राहतील. दर्शनरांगेचे नियमन करणे, भाविकांना आवश्यक सूचना देणे, गर्दीवर नियंत्रण ठेवणे आणि मंदिर परिसरातील व्यवस्था सुरळीत राखणे ही कामे हे स्वयंसेवक पार पाडतील. मंदिर प्रशासनाने 200 पोलिस कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे. पोलिस बंदोबस्त उपलब्ध झाल्यानंतर मंदिर परिसरासह दर्शनरांग, प्रवेशद्वार आणि पार्किंग परिसरातील सुरक्षेला अधिक बळकटी मिळणार आहे. वाहन पार्किंगच्या ठिकाणी वाहनांची ये-जा सुरळीत राहावी आणि पावसामुळे चिखल होऊ नये, यासाठी 700 ब्रास मुरूम टाकण्यात आला आहे. पावसापासून बचावासाठी तीन मंडप पावसापासून भाविकांचा बचाव व्हावा, यासाठी मंदिर विश्वस्त मंडळाने मंदिराच्या परिसरात 15 हजार चौरस फुटांचे एक आणि 5 हजार चौरस फुटांचे दोन पत्र्यांचे शेड उभारले आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर परिसरात बॅरिकेडिंग करण्यात आले असून, त्यातून दर्शनाची रांग शिस्तबद्ध पद्धतीने पुढे नेण्यात येणार आहे. महिलांना थेट प्रवेश, पुरुषांसाठी दर्शन रांग मंदिरात महिला भाविकांना थेट प्रवेश देण्यात येणार असून पुरुष भाविकांना बॅरिकेडिंगच्या दर्शनाच्या रांगेतून पुढे जावे लागणार आहे. यामुळे भाविकांना सुमारे तासाभरात दर्शन मिळेल. तसेच परिसरात सध्या सभामंडपाचे काम सुरू आहे. याशिवाय श्रावण महिन्यात भंडाऱ्याच्या (महाप्रसाद) दृष्टीने 5 हजार चौरस फुटांचे शेड उभारले जाणार आहे. परिसरात मंगल कार्यालय, भोजनशाळा आणि व्यायामशाळेचे कामही केले जाणार आहे. राज्याच्या विविध भागांतून येतात भाविक श्रावणातील धार्मिक महत्त्वामुळे भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी दरवर्षी राज्याच्या विविध भागांतून भाविक येतात. यंदा शुक्रवार आणि शनिवारी मिळून 10 लाख भाविक हजेरी लावतील, असा अंदाज विश्वस्त मंडळाने व्यक्त केला आहे. भाविकांना सुरक्षितपणे दर्शन मिळावे, यासाठी विविध स्तरांवर नियोजन करण्यात आले आहे. यंदाही अभिषेक ठेवले जाणार बंद श्रावण महिन्यात भाविक अभिषेकासाठी येतात; परंतु यंदाही अभिषेक बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांना केवळ दर्शन घेता येणार असून अभिषेकासाठी स्वतंत्र वेळ किंवा व्यवस्था राहणार नाही. – मिठ्ठू बारगळ, अध्यक्ष, भद्रा मारुती विश्वस्त मंडळ



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *