Headlines

रीलच्या नादात वाल्मीच्या तलावात विद्यार्थी बुडाला:शूटिंग करताना पाण्याचा अंदाज आला नाही




इन्स्टाग्राम रील बनवण्याच्या नादात वाल्मी येथील तलावातील खड्ड्यात बुडून १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. हसनैन मोईनोद्दीन शेख (१६, रा. शहानगर, बीड बायपास) असे त्याचे नाव. तो बारावीत शिकत होता. हसनैन सकाळी २ मित्रांसोबत वाल्मी परिसरातील तलावावर रील तयार करण्यासाठी गेला होता. व्हिडिओ काढत असताना तो पाण्यात उतरला. मात्र, या तलावात मोठे खड्डे आहेत, याची त्याला कल्पना नव्हती. पाण्यात पुढे जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो एका खोल खड्ड्यात पडला आणि गटांगळ्या खाऊ लागला. आपला मित्र बुडत असल्याचे पाहून सोबत असलेल्या मित्रांनी घाबरून आरडाओरड केली व परिसरातील नागरिकांना मदतीसाठी बोलावले. नागरिकांनी या घटनेची माहिती सातारा पोलिस आणि अग्निशमन दलाला दिली. सातारा पोलिस, अग्निशमन दलाच्या जवानांनी हसनैनला बेशुद्धावस्थेत पाण्याबाहेर काढले व उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद सातारा ठाण्यात करण्यात आली आहे. उत्खननामुळे जीवघेणे खड्डे वाल्मी परिसरातील या तलावाला कोणतीही सुरक्षा भिंत किंवा कुंपण नाही. धोक्याचा इशारा देणारे सुरक्षा फलकही येथे लावलेले नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे, भूमाफियांनी या तलावातून मोठ्या प्रमाणात माती आणि मुरुमाचा उपसा केला आहे. उत्खननामुळे तलावात खोल खड्डे निर्माण झाले आहेत. पाण्याचा अंदाज न आल्याने हेच खड्डे आता तरुणांच्या जिवावर उठले आहेत. गेल्या वर्षी घेतली दुचाकी हसनैनचे वडील रेल्वे मालधक्क्यावर हमाली करतात. ३ बहिणींच्या पाठीवर असलेला हसनैन हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. वर्षभरापूर्वीच वडिलांनी त्याला नवी दुचाकी घेऊन दिली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *